भारत आणि पाकिस्तान यांच्यात मसुद्यावर चार तास चर्चा

कर्तारपूर मार्गिकेबाबत भारत व पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या फेरीच्या चर्चेत या मार्गिकेच्या संचालनाबाबतचा मसुदा ८० टक्के मान्य करण्यात आल्याची माहिती, पाकिस्तानी शिष्टमंडळाचे प्रमुख व परराष्ट्र प्रवक्ते महंमद फैजल यांनी दिली.

वाघा सीमेवर दोन्ही देशातील दोन शीख धार्मिक ठिकाणांना जोडणाऱ्या कर्तारपूर मार्गिकेच्या मसुद्यावर चार तास चर्चा झाली, त्यानंतर ते बोलत होते. फैजल यांनी सांगितले, की मसुद्यातील ८० टक्के मुद्दे मान्य करण्यात आले आहेत. पुढील बैठकीत वीस टक्के मुद्दय़ांवर सहमती होईल. नोव्हेंबरमध्ये किती शीख भाविकांना कर्तारपूर येथे प्रवेश देणार याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, की पाच ते आठ हजार भाविकांना प्रवेश दिला जाईल, पण नेमकी संख्या आताच सांगता येणार नाही. यातील मसुदा अंतिम होत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा तपशील जाहीर करणार नाही.

पाकिस्तान व भारत यांच्यातील दोन शीख धर्मस्थळांना जोडणाऱ्या कर्तारपूर मार्गिकेबाबत दोन देशात चर्चेच्या दुसऱ्या फेरीला सुरूवात झाली, त्यात कराराचा मसुदा व मार्गिकेचे संचालन तसेच इतर तांत्रिक बाबींवर चर्चा झाल्याचे समजते.

पाकिस्तानातील कर्तारपूरचे दरबार साहिब व गुरूदासपूर जिल्ह्य़ातील डेरा बाबा नानक ही दोन शीख धर्मस्थळे जोडण्यात येत असून कर्तारपूर साहिबला जाणाऱ्या शीख भाविकांना व्हिसा मुक्त पर्यटनास परवानगी देण्यात येत आहे. त्यांना फक्त त्यासाठी कर्तारपूरला भेट देण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. कर्तारपूर येथे १५५२ मध्ये शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव यांनी कर्तारपूर साहिब हे धर्मस्थळ उभे केले होते.

बैठकीच्या अगोदर पाकिस्तानच्या तेरा सदस्यांच्या शिष्टमंडळाचे प्रमुख महंमद फैजल यांनी सांगितले, की फलदायी चर्चेची आमची अपेक्षा आहे. या मार्गिकेचे सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे. फैजल हे दक्षिण आशिया विभाग व सार्कचे महासंचालक असून पाकिस्तान सकारात्मक भावनेने या चर्चेत सहभागी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहिली चर्चा फेरी यशस्वी झाली असून दुसरी फेरी एप्रिलमध्ये होणार होती, पण आता ती होत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना प्रादेशिक शांततेची अपेक्षा असून त्यांनी नोव्हेंबर २०१९ पर्यंत गुरूनानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त ही मार्गिका खुली करण्याचे आश्वासन दिले होते, ते  पूर्ण केले जाईल.  भारताच्या परराष्ट्र खात्याचे शिष्टमंडळ सकाळी सव्वानऊ वाजता येथे आले असून त्यात आठ सदस्य आहेत. शून्य बिंदूवरील संपर्क जोडणी, यात्रेकरूंची संख्या या मुद्दय़ांवर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी दिल्लीत सांगितले. समितीत खलिस्तानी फुटीरतावाद्याचा समावेश केल्याने त्याला भारताचा विरोध आहे.

सुरक्षेबाबत भारताकडून चिंता व्यक्त

कर्तारपूर साहिब गुरुद्वाराच्या यात्रेत अडथळे आणण्याच्या संभाव्य शक्यतांबाबत भारताने रविवारच्या बैठकीत चिंता व्यक्त केली असून भारतविरोधी कोणत्याही कारवायांना यात थारा दिला जाणार नाही, असे आश्वासन पाकिस्तानने त्यावर दिले आहे. अटारी – वाघा सीमेवर कर्तारपूर मार्गिकेबाबत झालेल्या बैठकीची माहिती देताना भारताने सांगितले, की पाकिस्तानने या मार्गिकेदरम्यान एक पूल बांधण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. भारतीय पासपोर्ट धारकांना व ओसीआय कार्डधारकांना मोफत प्रवास व व्हिसा सुविधा देण्याचे मान्य केले आहे. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व गृह मंत्रालयाचे सहसचिव एससीएल दास यांनी केले. कर्तारपूर येथे जाण्यास पाच हजार भाविकांना दर दिवशी परवानगी दिली जाणार आहे. प्रवाशांसाठी १५ हजार क्षमतेचे केंद्र भारत बांधणार आहे.

खलिस्तानवादी फुटीर नेता चावला याची हकालपट्टी

कर्तारपूर मार्गिका समितीतून पाकिस्तानने फुटीरतावादी खलिस्तानी नेता गोपाल सिंग चावला याचे नाव वगळले असून भारताने त्याच्या समावेशाला आधीच आक्षेप घेतला होता.  दोन्ही देशात या मार्गिकेबाबत चर्चेची दुसरी फेरी सुरू होण्याच्या आधीच ही घोषणा करण्यात आली. वाघा येथे दोन्ही देशात ही चर्चा सुरू झाली आहे.

शीख भविकांसाठी ही मार्गिका सुरू करण्याच्या वाटाघाटीसाठी नेमण्यात आलेल्या समितीत खलिस्तानी फुटीरतावादी नेता गोपालसिंग चावला याचा समावेश करण्यात आला होता. चावला याचा समावेश या समितीत असेल तर  भारत चर्चाच करणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे पाकिस्तानला नमते घेण्याची वेळ आली. चावला हा पाकिस्तान शीख गुरूद्वारा प्रबंधक समितीचा सरचिटणीस आहे. इटीपीबी ( इव्हॅक्युइ ट्रस्ट प्रॉपर्टी  बोर्ड) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की चावला याला संस्थेच्या सरचिटणीस पदावरून हटवण्यात आले असून तो आता पाकिस्तान शीख गुरूद्वारा प्रबंधक समितीचा सदस्यही राहणार नाही. चर्चेच्या दुसऱ्या फेरीत भाग घेणाऱ्या पाकिस्तानी शिष्टमंडळात त्याचा समावेश असणार नाही. पाकिस्तान शीख गुरूद्वारा प्रबंधक समितीचा अध्यक्ष तारा सिंग यालाही नवीन समितीतून काढण्यात आले आहे. आता या संस्थेचे अध्यक्ष व सरचिटणीस यांची नव्याने निवड होणार आहे. चावला हा कर्तारपूर मार्गिकेसाठी नोव्हेंबरमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या समवेत उपस्थित होता.