कर्तारपूर साहिब कॉरिडॉरसंबंधी बुधवारी भारत-पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेली चर्चा शंभर टक्के यशस्वी होऊ शकली नाही. कर्तारपूर साहिब कॉरिडॉर करारासंबंधी पाकिस्तानने केलेली मागणी भारताने फेटाळून लावली. दोन्ही देशांमध्ये झालेल्या तिसऱ्या फेरीच्या चर्चेनंतर भारताने पाकिस्तानला त्यांच्या दोन मागण्यांचा फेरविचार करण्यास सांगितले. कर्तारपूर साहिब गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या यात्रेकरुंवर पाकिस्तानला सेवा शुल्क आकारायचे आहे तसेच गुरुद्वारा परिसरात भारताच्या राजनैतिक किंवा शिष्टाचार अधिकाऱ्याला परवानगी देण्यास पाकिस्तान तयार नाही.

सेवा शुल्क आकारण्याची पाकिस्तानची मागणी मान्य करण्यास भारताने नकार दिला. भारतीय यात्रेकरुंना कुठल्याही निर्बंधांशिवाय व्हिसा मुक्त प्रवास करु देण्यावर दोन्ही देशांचे एकमत आहे. दरदिवशी कॉरिडॉरच्या मार्गाने ५ हजार यात्रेकरुंना कर्तारपूर साहिब गुरुद्वारामध्ये प्रवेश देण्याचे ठरले आहे. काही खास प्रसंगातच ५ हजारपेक्षा जास्त यात्रेकरुंना प्रवेश दिला जाईल.

बुधी रावी चॅनलवर पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रेकरुंना सहजतेने दर्शन घेता यावे यासाठी सुरक्षित वातावरण निर्मिती करण्यावर दोन्ही बाजूंचे एकमत आहे. दरदिवशी यात्रेकरुंबरोबर शिष्टाचार अधिकाऱ्याला परवानगी देण्याची भारतीय शिष्टमंडळाने विनंती केली. पण पाकिस्तानने भारताची मागणी मान्य करण्यास नकार दिला.