माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम देश सोडून जाऊ शकत नाहीत असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. कार्ती चिदंबरम यांच्या विरोधातील ‘लुक आऊट’ नोटीसला स्थगिती देण्याचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने होता. या निर्णयाविरोधात सीबीआयनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, मद्रास उच्च न्यायालयानं लुकआऊट नोटीसवर जी स्थगिती दिली होती ती सुप्रीम कोर्टानं मागे घेतली आहे, त्याचमुळे कार्ती चिदंबरम हे देश सोडून जाऊ शकत नाहीत.

कार्ती चिदंबरम यांची रवानगी तुरूंगात केली जावी म्हणून आम्ही लुकआऊट नोटीस बजावली नव्हती असं सीबीआयनं कोर्टात सांगितलं. विदेशात जाण्याआधी कार्ती चिदंबरम यांनी तपास यंत्रणांना कल्पना द्यावी यासाठी ही नोटीस बजावण्यात आली होती. सीबीआयची बाजू ऐकून घेतल्यानंतर कार्ती चिदंबरम यांनी देश सोडून जाऊ नये असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे तसंच चौकशीसाठी कधी हजर होणार हे कार्ती चिदंबरम यांनी १८ ऑगस्ट रोजी सांगावं असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

कार्ती चिदंबरम यांच्यावर भ्रष्टाचार केल्याप्रकरणी एफआयआऱ दाखल करण्यात आली आहे. तसंच अंमलबजावणी संचलनालयानंही (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणी कार्ती चिदंबरम आणि आयएनएक्स मीडियावर एफआयआर दाखल केली होती. विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाकडून मंजुरी मिळवून विदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठी कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप कार्ती चिदंबरम यांच्यावर आहे.

आयएनएक्स ही कंपनी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या मालकीची आहे, २००७ मध्ये याच कंपनीला नियमबाह्य मदत केल्याचा आरोप कार्ती चिदंबरम यांच्यावर आहे, तसंच यासाठी त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री पदावर असलेल्या पी चिदंबरम यांच्या पदाचा गैरवापर केल्याचाही आरोप आहे. मात्र आपल्यावरील सगळे आरोप कार्ती चिदंबरम यांनी फेटाळून लावले आहेत.

आता भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीसाठी लवकरात लवकर सीबीआयसमोर हजर व्हावं असे आदेश सुप्रीम कोर्टानं कार्ती चिदंबरम यांना दिले आहेत. तसंच १६ ऑगस्ट रोजी कार्ती चिदंबरम परदेशात जाणार होते मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे कार्ती चिदंबरम देश सोडून जाऊ शकत नाहीत.