स्वत:चे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं लपवण्यासाठीच मोदी सरकारने कार्ती चिदंबरम यांच्यावर कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. मोदी सरकारने सूडापोटी केलेल्या कारवाईमुळे आम्ही घाबरणार नाही. यापुढेही मोदी सरकारची पोलखोल करतच राहू, असेही त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना बुधवारी सीबीआयने चेन्नई विमानतळावरुन अटक केली. या कारवाईवर रणदीप सुरजेवाला यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, स्वत:चे घोटाळे आणि भ्रष्टाचारावरुन अन्यत्र लक्ष वळवण्याची मोदी सरकारची ही जुनीच पद्धत आहे. पी. चिदंबरम व त्यांच्या कुटुंबीयांवर सूडापोटी कारवाई केली जात आहे. मात्र या कारवाईनंतरही आम्ही थांबणार नाही. आम्ही मोदी सरकारच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करत राहू. मोदींना जनतेला उत्तर द्याव लागेल, असे त्यांनी नमूद केले. रोटोमॅक, नीरव मोदी, मेहुल चोक्सीप्रकरणावरुन लक्ष वळण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला २००७ मध्ये नियमापेक्षा अधिक परकीय गुंतवणूक मिळाल्यानंतर ते कायद्याच्या कचाट्यात सापडू नये यासाठी कार्ती चिदंबरम यांनी वडील पी. चिदंबरम यांच्या मदतीने नियम वाकवल्याचा आरोप आहे. बुधवारी कार्ती चिदंबरम लंडनवरुन चेन्नईला परतले असता सीबीआयने विमानतळावरुन त्यांना अटक केली.