२३ दिवस कारागृहात काढल्यानंतर अखेर कार्ती चिदंबरम यांना शुक्रवारी जामीन मंजूर झाला. कार्ती माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा आहे. ४६ वर्षीय कार्ती चिदंबरमला १ मार्च रोजी चेन्नई विमानतळावर अटक करण्यात आली होती. लंडनहून आलेल्या विमानातून उतरल्या उतरल्या कार्तीला ताब्यात घेण्यात आले होते. कार्ती चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडिया या टेलिव्हिजन कंपनीत ३०० कोटी रुपयांच्या परकीय गुंतवणूकीसाठी सरकारी परवानग्या मिळवून दिल्याचा आरोप आहे. कार्ती यांनी या परवानग्या मिळवून देण्यासाठी वडिलांच्या पदाचा फायदा घेतला असा तपासकर्त्या अधिकाऱ्यांचा आरोप आहे.

ज्यावेळी हे प्रकरण घडले त्यावेळी केंद्रात काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते आणि चिदंबरम केंद्रात अर्थमंत्री होते. या परवानग्या मिळवून देण्याच्या मोबदल्यात कार्ती यांनी लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. या प्रकरणात माझ्या मुलाला झालेली अटक राजकीय हेतूने प्रेरित आहे असे पी. चिदंबरम यांनी आधीच म्हटले आहे.

मी राजकारण्याचा मुलगा आहे म्हणून मला लक्ष्य केले जातेय असे कार्तीने कोर्टाला सांगितले. शीना बोरा हत्या प्रकरणात पीटर आणि इंद्राणी मुखर्जीची चौकशी सुरु असताना आयएनएक्स मीडियाचे प्रकरण समोर आले. त्यांनीच कार्ती चिदंबरमचे नाव घेतले होते. सध्या इंद्राणी आणि पीटर दोघेही तुरुंगात आहेत.

मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात कार्ती चिदंबरम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पुढच्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते. सीबीआयने कार्ती विरोधात दाखल केलेले प्रकरण रद्द करण्यास मद्रास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यामुळे कार्ती यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.