तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांची प्रकृती ढासळत चालली आहे. शरीरातील महत्वाच्या अवयवांचे कार्य चालू ठेवणे आव्हानात्मक बनत चालले आहे असे चेन्नईच्या कावेरी हॉस्पिटलकडून सांगण्यात आले आहे. कावेरी रुग्णालयाबाहेर द्रमुकच्या समर्थकांची गर्दीही वाढत चालली आहे.

मंगळवारी दुपारी अडीजच्या सुमारास द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एमके स्टालिन यांनी कुटुंबियांसह राज्याचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांची त्यांच्या ग्रीनवेस रोड निवासस्थानी भेट घेतली व त्यांना वडिलाच्या प्रकृतीविषयी माहिती दिली.

द्रमुकचे नेते टीआर बालू, मुरासोली सेल्वम आणि आय पेरीयासामी सुद्धा यावेळी उपस्थित होते. काल रात्री हॉस्पिटलने मेडिकल बुलेटिनद्वारे करुणानिधींची प्रकृती आणखी खराब झाल्याची बातमी दिल्यानंतर रुग्णालयाबाहेर समर्थकांची गर्दी उसळली होती.