डीएमकेमधून हकालपट्टी करण्यात आलेले खा़ अळ्ळगिरी यांनी सोमवारी नवीन पक्ष स्थापन करण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला़, परंतु पिता आणि डीएमकेचे प्रमुख करुणानिधी हे विश्वासघातकी लोकांच्या पकडीत असून त्यांची सुटका करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी कनिष्ठ बंधू एम़ के. स्टॅलिन यांच्यावर हल्लाबेाल केला़
मी डीएमकेसोबत आह़े मला कोणताही ‘कलांगर डीएमके’ नावाने कोणताही नवा पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता नाही, असे अळ्ळगिरी यांनी येथे सांगितल़े त्यांच्या समर्थकांचा भव्य मेळावा त्यांच्याच मतदारसंघात आयोजित करण्यात आला होता़ त्या वेळी त्यांनी करुणानिधींना वाचविणे हेच आपले आद्यकर्तव्य असल्याचे सांगत अप्रत्यक्षरीत्या स्टॅलिन यांच्यावर टीका केली़
समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जानेवारीत ठिकठिकाणी लावलेल्या फलकांमुळे आपल्यावर कारवाई झाल्याचे अळ्ळगिरी यांनी मान्य केले; परंतु आपल्यावरील कारवाई अयोग्य असल्याचेही ते म्हणाल़े तुम्ही माझ्यावरील प्रेमापोटी ते फलक लावलेत; परंतु तुमच्या त्या फलकांमुळेच सगळी समस्या उद्भवली आह़े त्यामुळे माझ्या समर्थकांनी अशी फलके लावणे थांबवावे, असे अळ्ळगिरी यांनी स्पष्ट शब्दांत समर्थकांना सुनावल़े
पक्षानेही कार्यकर्त्यांच्या या भावनांना समजून घेणे आवश्यक होते; परंतु त्यांनी हा प्रश्न गुंतागुंतीचा बनविला़ हे केवळ अहंकारामुळेच झाले, असा आरोपही अळ्ळगिरी यांनी केला़ त्यांनी डीएमकेच्या उमेदवार निवडीवरही टीका केली़ थेनी, विरुधूनगर व रामनाथपूरम या दक्षिण तामिळनाडूमधील मतदारसंघांत पक्षाने दिलेल्या उमेदवारांना जनता निवडून देणार नाही, असेही त्यांनी म्हटल़े

मोदींना पाठिंबा
मला वाटते देशात मोदीलाट आह़े मी आधीच म्हटले आहे की, मोदी हे चांगले प्रशासक आहेत़ ते पंतप्रधान होणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असे अळ्ळगिरी यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आह़े