उत्तर प्रदेशमधील कासगंज येथील हिंसाचार हा राज्यावरील कलंक असून अशा घटना पुन्हा घडणार नाही यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी प्रतिक्रिया राज्यपाल राम नाईक यांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशमधील कासगंज येथे प्रजासत्ताक दिनी तिरंगा रॅलीच्या मुद्द्यावरुन शुक्रवारी दोन गटांत हिंसाचार झाला होता. जमावाच्या गोळीबारात चंदन गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला होता. सोमवारी कासगंजमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले असले तरी परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल राम नाईक यांनी सोमवारी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कासगंजमध्ये जे झाले ते अशोभनीय आहे. तिथे घडलेली घटना ही उत्तर प्रदेशवरील कलंक आहे. सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सरकारने पावले उचलावीत, असे नाईक यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश सरकारने हिंसाचाराप्रकरणी कासगंजमधील पोलीस अधीक्षक सुनीलकुमार सिंह यांची मेरठमध्ये बदली केली आहे. पियूष चावला यांची कासगंजच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

योगी सरकारने हिंसाचारात जीव गमावणाऱ्या चंदन गुप्ताच्या कुटुंबीयांना २० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र, चंदन गुप्ताच्या आईने ही मदत नाकारली आहे. आम्हाला आर्थिक मदत नको, माझ्या मुलाला शहीदाचा दर्जा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. परिसरातील दुकाने आता उघडली असून जनजीवन पूर्वपदावर परतत आहे. ही चांगली गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंसाचारातील जखमी राहुल उपाध्याय याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची अफवा सोमवारपासून पसरली होती. शेवटी अलीगड झोनचे पोलीस महानिरीक्षक संजीव गुप्ता यांनी या अफवेवर स्पष्टीकरण दिले. राहुल उपाध्याय जिवंत असून त्याच्या मृत्यूची अफवा पसरवल्याप्रकरणी आम्ही ४ जणांना अटक केली आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कासगंजमधील हिंसाचाराप्रकरणी आत्तापर्यंत १०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारात तीन दुकाने, एक बस आणि कार जाळण्यात आली होती.