उत्तर प्रदेशमधील कासगंजमधील हिंसाचारावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. कासगंजमध्ये देशभक्तांवर गोळीबार झाला असून ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, असे त्यांनी म्हटले आहे. कासगंजमध्ये दोन गटात झालेल्या वादात एका तरुणाचा मृत्यू झाला होता.

उत्तर प्रदेशमधील कासगंज येथे प्रजासत्ताक दिनी तिरंगा रॅलीच्या मुद्द्यावरुन शुक्रवारी दोन गटांत हिंसाचार झाला होता. जमावाच्या गोळीबारात चंदन गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला होता. या हिंसाचारावरुन आता राजकारण सुरु झाले असून केंद्र सरकारने अद्याप या हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली नव्हती. मंगळवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी प्रतिक्रिया दिली. ‘कासगंजमध्ये देशभक्तांवर गोळीबार झाला. ही दुर्दैवी घटना असून राज्यात योगी सरकार चांगले काम करत आहे. त्यांना केंद्राकडून जी मदत हवी ती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

कासंगजमधील हिंसाचारावरुन राजकारणही सुरु झाले आहे. कासगंजमधील हिंसाचारावरुन बरेलीतील जिल्हाधिकाऱ्यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली होती. मुस्लीमबहुल वस्तीत पाकिस्तानविरोधी घोषणा का दिल्या जातात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. जिल्हाधिकारी राघवेंद्र विक्रम सिंह यांच्यावर भाजप नेते विनय कटियार यांनी टीकास्त्र सोडले आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई केली असती तर दंगल भडकलीच नसती. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच हिंसाचार झाला. बरेलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची मानसिक अवस्था ढासळली असून त्यांना उपचारांची गरज असल्याचे कटियार यांनी सांगितले. भारतात जर पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देणार नाही तर मग कसले देणार? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.