वाराणसीहून इंदोरसाठी रविवारपासून काशी महाकाल एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. या एक्स्प्रेसमध्ये भगवान शंकरासाठी एक सीट कायमची आरक्षित ठेवण्यात आली असून त्या जागेला देव्हाऱ्यासारखे रुप देण्यात आले आहे. त्यावरून आता राजकरण चांगलेच तापले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.


ओवेसींनी ट्विट करत पंतप्रधान मोदी यांना भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची आठवण करून दिली आहे. ओवेसी यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे एक्स्प्रेसमधील सीटचे मंदिरात रूपांतरण करण्यात आक्षेप नोंदवलाय.

रविवारी सांयकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी वाराणसीहून इंदोरसाठी जाणाऱ्या काशी महाकाल एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन २० फेब्रुवारीपासून नियमित सुरू होत आहे. पण, या एक्स्प्रेसमधील B5 डब्यातील सीट क्रमांक ६४ वर भगवान शंकराचे छोटे मंदिर उभारण्यात आलं आहे. या सीटला हूभेहूभ देव्हाऱ्यासारखं रूप देण्यात आलं आहे. B5 मधील ६४ क्रमांकाचं सीट कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात आल्याचं रेल्वेच्या आधिकाऱ्यानं सांगितलं आहे. त्यामुळे सध्या चर्चेला उधाण आलं आहे.