वाराणसीत (काशी) गेल्या पाच वर्षात विकासाच्या गतीने वेग पकडला आहे, हा वेग आता कमी होता कामा नये त्यासाठी वाराणसीवासियांनी मतदानाचा नवा विक्रम प्रस्थापित करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जनतेला केले आहे. मतदानापूर्वी मोदींनी एका व्हिडीओच्या माध्यमातून वाराणसीच्या जनतेला हे आवाहन केले आहे.


मोदी म्हणाले, वाराणसीचा केवळ विकासच नव्हे तर आध्यात्मिक विकासही होत आहे. परदेशी राष्ट्रांचे प्रमुखही वाराणसीच्या आध्यात्मिकतेचे कौतुक करीत आहेत. यावेळी मोदींनी स्वतः लिहिलेल्या एका कवितेच्या ओळीही वाचून दाखवल्या. यामध्ये त्यांनी वाराणसीच्या परंपरेचे आणि आध्यात्मिकतेचे कौतुक केले आहे.

दरम्यान, मोदींनी वाराणसीच्या जनतेला विक्रमी मतदान करण्याचे आवाहनही केले. संपूर्ण देशाचे सध्या वाराणसीकडे लक्ष आहे, इथल्या लोकांनी आपल्या पारंपारिक वेशभूषेत, वाजत-गाजत मतदानासाठी जावे. इथल्या जनतेला माझे आग्रहाचे सांगणे आहे की, त्यांनी पहिल्यांदा मतदान करावे आणि त्यानंतरच जेवण करावे. त्याचबरोबर मतदानानंतर सेल्फी जरुर काढावा, तसेच तो सोशल मीडियावर शेअरही करावा. केवळ नरेंद्र मोदींसाठीच नाही तर वाराणसीसाठी मतदानात नवा विक्रम प्रस्थापित व्हावा, संपूर्ण देशातील मतदानाचा विक्रम वाराणसीवासीयांनी तोडावा, अशी इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखवली.