लंडन : काश्मीर हा भारत व पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संभाषणात स्पष्ट केले आहे. दोन्ही नेत्यांची मंगळवारी दूरध्वनीवर चर्चा झाली होती.

गेल्या महिन्यात जॉन्सन यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यानंतर त्यांनी जगातील अनेक देशांच्या नेत्यांना दूरध्वनी केले, त्या मालिकेत त्यांनी मोदी यांनाही दूरध्वनी केला होता. त्यात त्यांनी सांगितले,की भारत व ब्रिटन यांच्या मैत्रीला वेगळे महत्त्व आहे.

डाउनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने सांगितले की, मोदी यांच्याशी जॉन्सन यांनी काश्मीरच्या मुद्दय़ावरही चर्चा केली. त्यात त्यांनी काश्मीर हा भारत व पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न असून दोन्ही देशांनी संवादाच्या मार्गाने तो प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला आहे.

व्यापार व आर्थिक क्षेत्रात दोन्ही देशातील संबंध महत्त्वाचे असल्याचे जॉन्सन यांनी म्हटले आहे. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी भारत व ब्रिटन यांच्यात सहकार्याला मोठा वाव असल्याचे म्हटले आहे. या आठवडा अखेरीस फ्रान्समध्ये जी ७ देशांची बैठक होत असून त्यात मोदी व जॉन्सन यांची प्रत्यक्ष भेट होणार आहे. त्यामुळे या शिखर बैठकीच्या दृष्टिकोनातूनही उभय नेत्यांनी चर्चा केली. हवामान बदल व जैवविविधता यांना असलेल्या आव्हानाच्या प्रश्नावर एकत्रित काम करण्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले आहे.

दहशतवाद व हिंसाचाराच्या मुद्दय़ावरही चर्चा झाल्याचे मोदी यांच्या कार्यालयाने ट्विट संदेशात म्हटले आहे. लंडनमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वेळी पाकिस्तानी समर्थक निदर्शकांनी भारतीय उच्चायुक्तालयासमोर धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले असता, अशा घटनात आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना करण्याचे आश्वासन देऊन जॉन्सन यांनी घडल्या प्रकाराबाबत खेद व्यक्त केला.  भारत व युरोपसह सर्वच ठिकाणी दहशतवादाचा धोका वाढल्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी या संभाषणात चिंता व्यक्त केली.