पुलवामा येथे जैश ए महंमद या संघटनेने केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा अमेरिका, रशिया, संयुक्त राष्ट्रे यांनी निषेध केला असून भारताला दहशतवाद विरोधी लढाईत पाठिंब्याचे वचन देण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्रांचे  सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनी सांगितले, की जम्मू काश्मीरमध्ये  पुलवामा जिल्ह्य़ात करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या वतीने निषेध करण्यात येत असून यातील जबाबदार व्यक्तींना कठोर शिक्षा करण्यात यावी,  जखमींना लवकर बरे वाटावे अशी सदिच्छा आहे. जैशचा दहशतवादी मासूद अझर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याबाबत त्यांनी हा प्रश्न सुरक्षा मंडळाच्या अखत्यारीत असल्याचे स्पष्ट केले.

पाकिस्तानने नेहमीच दहशतवादी हिंसाचाराचा निषेध केला आहे, पण भारतीय माध्यमे व सरकार यांनी या हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध चौकशी न करता जोडला त्याचाही आम्ही निषेध करतो असे पाकिस्तानने म्हटले आहे. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा अमेरिकेने निषेध केला असून परराष्ट्र खात्याचे उपप्रवक्ते रॉबर्ट पॅलाडिनो यांनी सांगितले की, पाकिस्तानने दहशतवाद्यांना मोकळे रान देणे बंद करावे.

रशियाने हे अमानवी कृत्य असल्याचे सांगून दुटप्पी भूमिका न घेता यावर निर्णायक व सामूहिक कारवाईची गरज प्रतिपादन केली आहे. अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवलेल्या संदेशात या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी सुषमा स्वराज यांना संदेश पाठवून पुलवामा हल्ल्यावर सहवेदना व्यक्त केली आहे.

भारताच्या दहशतवाद विरोधी लढयास आमचा पाठिंबा असून फ्रान्स या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत आहे, असे फ्रान्सचे राजदूत अलेसांद्रे झिगलर यांनी म्हटले आहे. दहशतवादी हल्ल्यात ४० जवान मरण पावण्याची घटना वेदनादायी असून सर्वप्रकारच्या दहशतवादाचा आम्ही निषेध करतो, या अवघड प्रसंगी आम्ही भारताबरोबर आहोत, असे जर्मनीने म्हटले आहे.

हल्ल्यात बळी पडलेल्यांना कॅनडाच्या वतीने उच्चायुक्त नादीर पटेल यांनी श्रद्धांजली वाहिली असून या हल्ल्याचा निषेध केला आहे. या अवघड प्रसंगात आम्ही भारताच्या पाठीशी असून दहशतवादी हल्ला हे भ्याड कृत्य असून त्याचा निषेध करीत असल्याचे सौदी अरेबियाच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे. संयुक्त अरब अमिरातीनेही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.