ब्रिटनमधील मजूर पक्षाचे नवनिर्वाचित नेते केर स्टार्मर यांचे प्रतिपादन

 लंडन : काश्मीर हा भारत व पाकिस्तान यांनी शांततामय मार्गाने सोडवण्याचा द्विपक्षीय मुद्दा असल्याचे ब्रिटनमधील विरोधी मजूर पक्षाचे नवनिर्वाचित नेते केर स्टार्मर यांनी म्हटले. भारतीय उपखंडातील अशाप्रकारच्या फूटपाडू मुद्दय़ांमुळे ब्रिटनमधील समुदायांमध्ये फूट पाडण्याची मुभा दिली जाऊ नये, यावर त्यांनी भर दिला.

भारतीय समुदायापर्यंत पोहचण्याचा, तसेच यापूर्वी पक्षनेतृत्वाने या मुद्दय़ावर घेतलेल्या विरोधी भूमिकेपासून अंतर राखण्याचा प्रयत्न म्हणून, लंडनमध्ये गुरुवारी ‘लेबर फ्रेंड्स ऑफ इंडिया’ या गटाशी प्रथमच साधलेल्या संवादात स्टार्मर यांनी भारतासोबत मजबूत असे औद्योगिक संबंध प्रस्थापित करण्याचा संकल्प बोलून दाखवला.

‘भारतीय उपखंडातील मुद्दय़ांचा येथील समुदायांना विभाजित करण्यासाठी वापर करण्याची मुभा आपण द्यायला नको. भारतातील कुठलेही घटनात्मक मुद्दे हा भारतीय संसदेचा विषय असून काश्मीर हा भारत व पाकिस्तान यांनी शांततामय मार्गाने सोडवण्याचा द्विपक्षीय मुद्दा आहे’, असे या बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात स्टार्मर म्हणाले.

यापूर्वी जेरेमी कॉर्बिन यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्षाने केलेल्या काही कृती या भारतविरोधी असल्याचे ब्रिटनमधील भारतीय समुदायाचे म्हणणे होते. त्यापासून फारकत घेणारी भूमिका यातून प्रदर्शित झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या मजूर पक्षाच्या वार्षिक परिषदेत, काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी करणारा ठराव संमत करण्यात आला होता.

या ठरावाचा डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत १५ लाख भारतीयांच्या मतांवर विपरीत प्रभाव पडल्याचे अनुभवाला आले.