बिहार विधानसभेच्या निवडणूक प्रचारात भाजपने काश्मीरचा, तर काँग्रेसने चीनचा मुद्दा उपस्थित करून प्रचाराचे रान पेटविण्याचा प्रयत्न चालविला आहे.

शुक्रवारी सासाराममधून प्रचाराला आरंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. जम्मू-काश्मीरसाठीचा अनुच्छेद ३७० पुन्हा आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न असून बिहारी जनतेकडे मते मागण्याची त्यांची हिंमत तरी कशी होते, असा शाब्दिक हल्ला मोदी यांनी चढवला. त्याचवेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी हिसुआ व कहलगाव येथील प्रचारसभांतून मोदींना लक्ष्य केले. भारतीय लष्कराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपमान केला आहे. चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षांत आपले जवान शहीद झाले पण, मोदींनी मात्र चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याचे वास्तव फेटाळून लावले, असा आरोप त्यांनी केला.

अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आला असला तरी, जम्मू-काश्मीरमधील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते त्याच्या पुनस्र्थापनेसाठी गुपकार कराराअंतर्गत एकत्र आले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. सासामरामधील सभेत त्याचा संदर्भ देत  मोदी म्हणाले की, देशातील प्रत्येकाला अनुच्छेद ३७० रद्द व्हावा असे वाटत होते, आम्ही तो रद्द केला. पण, आता हेच लोक (विरोधी पक्ष) सत्तेवर आल्यावर तो पुन्हा लागू करणार असल्याचे सांगत आहेत. हेच लोक बिहारच्या लोकांकडे मते मागत आहेत. बिहारी जनता आपल्या मुला-मुलींना देशाच्या सीमेवर लढण्यासाठी पाठवते, त्या बिहारचा हा (३७० साठीचा आग्रह) अपमान नव्हे का, असा सवाल त्यांनी समुदायाला केला.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या उपस्थितीत मोदी यांनी प्रचाराला सुरुवात केली. नितीशकुमार यांनी काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्यास विरोध केला होता. संसदेतील याबाबतच्या प्रस्तावावर जनता दल (सं)चे सदस्य मतदान न करता गैरहजर राहिले होते. जनता दलाच्या विरोधी भूमिकेची दखल न घेता मोदींनी काश्मीरवरून बिहारी मतदारांना काँग्रेस-राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीला मते न देण्याचे आवाहन केले.