काश्मीर खोऱ्यातील जनतेच्या मदतीसाठी सीआरपीएफकडून ‘मददगार’ ही हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. ११ ते १६ ऑगस्ट दरम्यान या हेल्पलाइनवर एकूण ७०७१ फोन आले. पाकिस्तानातून काही जणांनी या हेल्पलाइनवर फोन करुन शिवीगाळही केली. १७१ फोन कॉल हे देशाबाहेरुन आले तर २७०० फोन कॉल्स हे जवानांच्या कुटुंबियांनी केले. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या जवानांची खुशाली विचारण्यासाठी कुटुंबियांकडून हे फोन कॉल्स करण्यात आले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

सध्या राज्याबाहेर असलेल्या काश्मिरींकडून आपल्या नातेवाईकांची चौकशी करण्यासाठी ‘मददगार’ हेल्पलाइनवर एकूण ४२०० फोन कॉल्स करण्यात आले. काश्मीरमधल्या आपल्या नातेवाईकांची चौकशी करण्यासाठी एकूण २२ देशातून फोन कॉल्स करण्यात आले. यूएईमधून सर्वाधिक ३९, कुवेतमधून १२, इस्रायल आणि मलेशियामधून प्रत्येकी आठ, रशियामधून सात, अमेरिका आणि टर्कीतून सहा, ऑस्ट्रेलियातून पाच, यूके, सिंगापूर, बांगलादेशमधून प्रत्येकी चार, कॅनडा, बहरीन, जर्मनी, फिलीपाईन्स, थायलंडमधून प्रत्येकी तीन, ओमान, फ्रान्स आणि बेल्जियममधून प्रत्येकी दोन चीन आणि कतारमधून प्रत्येकी एक फोन आला होता.

काही फोन कॉल्स पाकिस्तानातूनही आले होते. काश्मीरमध्ये राहणाऱ्या आपल्या आप्तजनांची खुशाली विचारण्याचा त्यांचा प्रामाणिक हेतू होता तर पाकिस्तानातून काही जणांनी फोनवरुन शिवीगाळ केली. जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. काश्मीर खोऱ्यात मोठया प्रमाणावर निर्बंध आहेत. नागरीक घराबाहेर पडू शकत नाहीत. फोन, इंटरनेट सेवा बंद आहे. त्यामुळे नागरीकांची मोठया प्रमाणावर गैरसोय होतेय. पाकिस्तान आणि दहशतवादी फोन, इंटरनेटचा गैरवापर करण्याची शक्यता असल्यामुळे अजूनही पूर्णपणे ही सेवा बहाल करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत नागरीकांच्या मदतीसाठी सीआरपीएफने मददगार ही हेल्पलाईन सुरु केली आहे.