संपूर्ण काश्मीरमध्ये संचारबंदी उठवण्यात आली असून अनेक भागात प्रतिबंधात्मक आदेश मात्र जारी आहेत. संपूर्ण काश्मीर खोरे आज संचारबंदी मुक्त होते पण खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना एकत्र येण्यावर बंदी मात्र कायम ठेवली आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

काल काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा झाली असून त्यानंतर संचारबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. काश्मीर खोऱ्यात कुठेही अनुचित प्रकार आज घडलेला नाही. दुकाने व इतर व्यावसायिक आस्थापने मात्र बंद होती.

फुटीरतावाद्यांनी लागोपाठ ७९ व्या दिवशी बंद चालू ठेवल्याने लोकांची गैरसोय झाली. सार्वजनिक वाहतूक बंदच आहे. बाजारपेठा दुपारी २ वाजेपर्यंत सुरू असून फुटीरतावाद्यांनी बंदमधून १६ तासांची सूट दिली असून ती उद्या सकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहील.

काश्मीरमध्ये ८ जुलैच्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी याचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून सुरू झालेली हिंसाचाराची परिस्थिती अजून कायम असून आतापर्यंत ८२ जण त्यात मारले गेले आहेत, त्यात दोन पोलिसांचा समावेश आहे.