काश्मीरमध्ये मंगळवारी झालेल्या हिमस्खलनामुळे तीन जवान बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीरमधील कुपवाडा आणि बांदीपोरा जिल्ह्यात झालेल्या हिमस्खलनाच्या घटनांमध्ये तीन जवान बेपत्ता झाले आहेत. दरम्यान, लष्कराकडून शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे.

बांदीपोरामधील गुरेज सेक्टर आणि कुपवाडा जिल्ह्यातील करनाह सेक्टरमध्ये हिमस्खलनाच्या दोन घटना घडल्या. १८ हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर झालेल्या या हिमस्खलनामुळे तीन जवान बेपत्ता झाले असल्याची माहिती समोर आली आहे. लष्कराची हेलिकॉप्टर्स आणि बचाव पथकाकडून त्या जवानांचा शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे. लष्कराकडून या बचाव कार्याबद्दल मात्र अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

यापूर्वी दक्षिण सियाचीन ग्लेशिअरमध्ये सुमारे १८,००० फूट उंचीवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर पहाटे हिम कडा कोसळ्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाले होते. गस्ती पथकातील जवानांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने हेलिकॉप्टरचा वापर केला होता. १८ नोव्हेंबर रोजीदेखील सियाचीन ग्लेशिअरमध्ये अशाच प्रकारे एक गस्ती पथक हिमस्खलनाच्या तावडीत सापडले होते. यामध्ये चार जवान शहीद झाले होते तर दोन पोर्टर्सचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत गस्ती पथकातील ८ जवान आणि पोर्टर बेपत्ता झाले होते. सियाचीन ग्लेशिअर ही जगातील सर्वांत उंचावरील युद्धभूमी आहे.