प्रवेशबंदीचा आदेश राज्यपालांकडून रद्द

श्रीनगर, एक्स्प्रेस वृत्तसेवा

जम्मू-काश्मीरमधून अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांना माघारी पाठविण्याबाबत गृह विभागाने जारी केलेला २ ऑगस्टचा आदेश जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मागे घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १० ऑक्टोबरपासून (गुरुवार) होणार आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी काश्मीरचे नंदनवन पुन्हा खुले झाले आहे.

राज्यपाल मलिक यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर आता प्रथमच पर्यटकांना जम्मू-काश्मीरमध्ये जाता येणार आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थिती पूर्ववत करण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ब्लॉक विकास बोर्डाच्या निवडणुका घेण्याची घोषणा गेल्याच आठवडय़ात करण्यात आली होती. त्यानंतर तेथे पर्यटकांना प्रवेश देण्याचा हा निर्णय सोमवारी घेण्यात आला आहे.

पीडीपी नेत्यांना मेहबूबा भेटल्याच नाहीत

श्रीनगर : काश्मीरमधील स्थिती ही पक्षाच्या प्रश्नांपेक्षा मोठी असल्याचे स्पष्ट करून पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी स्वपक्षीय शिष्टमंडळास भेट देण्यास नकार दिला. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पीडीपीच्या नेत्यांना पक्षप्रमुखांना भेटण्याची परवानगी दिली, मात्र मेहबूबा आणि पक्षनेत्यांची भेट पुढील आठवडय़ापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

मेहबूबा आणि पक्षाचे बहुसंख्य नेते ५ ऑगस्टपासून नजरकैदेत असून तेव्हापासून ते पक्षाच्या कोणत्याही सदस्याला भेटलेले नाहीत. जम्मू-काश्मीर आणि मुंबईच्या आरे वसाहतीमधील स्थिती यांच्यात मेहबूबा यांनी तुलना केली. आरेमधील वृक्ष आणि काश्मिरींचे जीव, असे एका ट्वीटमध्ये म्हटले आहे. आरेमधील वृक्षतोड कार्यकर्ते थांबवू शकले त्याचा आनंद आहे, मात्र काश्मिरींना भाषणस्वातंत्र्यापासून का वंचित ठेवले जात आहे, असे ट्वीट त्यांनी केले आहे. मेहबूबा यांनी केवळ आपल्या कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान मेहबुबा यांना शिष्टमंडळाने भेटण्याबाबत जम्मूतील नेतृत्वाला विश्वासात घेतले नाही. पक्षातील काही ‘जमीन माफियांनी’ बैठक घेऊन हा निर्णय घेतल्याचा आरोप पीडीपीचे सरचिटणीस व माजी आमदार सुरिंदर चौधरी यांनी केला.