७१व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जम्मू व काश्मीर पोलिसांना सर्वाधिक, म्हणजे १०८ शौर्य पुरस्कार मिळाले आहेत. यामागोमाग ७६ पुरस्कार केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) पटकावले आहेत.

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार मोहीम राबवणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाला मिळालेल्या पुरस्कारांमध्ये, शौर्यासाठी या वर्षी जाहीर झालेल्या ४ राष्ट्रपती पोलीस पदकांपैकी ३ पदकांचा समावेश आहे. यामुळे, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेल्या एकूण २९० शौर्य पुरस्कारांपैकी जम्मू- काश्मीर पोलिसांना १०८ पदकांचा सिंहाचा वाटा मिळाला असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

अलीकडच्या काळात एखाद्या पोलीस दलाने जिंकलेल्या शौर्य पुरस्कारांची ही सर्वाधिक संख्या असल्याचे सुरक्षा दलांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

नक्षलवादविरोधी मोहिमांव्यतिरिक्त, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहिमांसाठी तैनात करण्यात आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलानेही सर्वाधिक शौर्य पुरस्कार मिळवण्याची आपली वाटचाल सुरूच ठेवली आहे. या दलाला ७५ राष्ट्रपती शौर्यपदके मिळाली असून ‘कोब्रा’ पथकाचे कमांडो उत्पल राभा यांना शौर्यासाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक मरणोत्तर मिळाले आहे. जून २०१८ मध्ये झारखंडमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते मरण पावले होते. या चकमकीत त्यांनी ‘असामान्य शौर्य’ दाखवल्याचे सन्मानपत्रात म्हटले आहे.

लष्कराच्या ६ जवानांना शौर्यचक्र

नवी दिल्ली : दहशतवादविरोधी आणि बंडखोरीविरोधी मोहिमांमध्ये शौर्य दाखवल्याबद्दल लष्कराच्या ६ सैनिकांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आले आहे. यापैकी एकाला हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला आहे. या पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा, मेजर कोंजेगभाम बिजेंद्र सिंह, नायब सुभेदार नरेंद्र सिंह आणि नायक नरेश कुमार यांचा समावेश आहे. नायब सुभेदार सोमबीर यांना मरणोत्तर शौर्यचक्र देण्यात आले आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते शहीद झाले होते.