अपघातात मुलाचा मृत्यू झाल्याने घरी आलेल्या जवानाची दहशतवाद्यांनी हत्या केल्याची घटना जम्मू- काश्मीरमध्ये घडली. दहशतवाद्यांनी पत्रकार असल्याची बतावणी करत जवानाच्या घरात प्रवेश केला आणि यानंतर जवानाची गोळी झाडून हत्या केली.

जम्मू- काश्मीरमध्ये कार्यरत असलेले प्रादेशिक सेनेतील जवान मुख्तार अहमद मलिक यांची दहशतवाद्यांनी सोमवारी हत्या केली. दहशतवाद्यांनी घरात घुसून मलिक यांच्यावर गोळीबार केला होता. मलिक यांच्या मुलाचा तीन दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. म्हणून ते रजा घेऊन घरी आले होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.

काही दिवसांपूर्वी मलिक यांच्या मुलाचा कुलगाममध्ये अपघात झाला होता. यानंतर तो कोमात होता. तीन दिवसांपूर्वी उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. मुलाच्या निधनानंतर मलिक रजा घेऊन घरी आले होते. सोमवारी दहशतवाद्यांनी पत्रकार असल्याची बतावणी करत मलिक यांच्या घरात प्रवेश केला. ‘संशयित दहशतवाद्यांना आम्हाला मलिक कुठे राहतो असे विचारले. मलिकच्या कुटुंबियांना भेटायचे आहे, असे त्यांनी सांगितले होते, असे स्थानिक सांगतात.

घरात मलिक दिसताच दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळी झाडली आणि तिथून पळ काढला, असे मलिक यांच्या एका नातेवाईकांनी सांगितले. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मलिक यांच्या हत्येनंतर स्थानिक माध्यमांचे पत्रकार वार्तांकनासाठी मलिक यांच्या घरी गेले असता नातेवाईकांनी तीव्र विरोध केला. अखेर काही नातेवाईकांनी घडलेला प्रकार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितला. दोन वर्षानंतर मलिक घरी आला होता. मुलाच्या मृत्यूमुळेच तो घरी आला होता, अशी माहितीही नातेवाईकांनी दिली. गेल्या १८ महिन्यात दहशतवाद्यांनी सुट्टी घेऊन घरी आलेल्या चार जवानांची हत्या केली आहे. हे चारही जवान दक्षिण काश्मीरमधील निवासी होती.