News Flash

काश्मीरी तरुणांना मदत केल्याबद्दल काश्मीरमध्ये स्थानिकांकडून शीख समुदायावर ऑफर्सचा पाऊस

मोफत हॉटेल स्टे, गाडी दुरुस्ती, क्लासेस अगदी किडनी दान करण्यासही काश्मीरमधील लोक पुढे आलेत

मदतीची ऑफर

काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहीद झाले. यानंतर देशभरामध्ये पाकिस्तानविरोधात अनेकांनी निदर्शने करून दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली. तर दुसरीकडे या हल्ल्याच्या निषेधार्थ देशातील विविध ठिकाणी काश्मीरमधील तरुणांना मारहाण करण्याच्या घटना घडला. मात्र अनेक ठिकाणी काश्मीरी तरुणांवर असे हल्ले होत असतानाच शीख समुदायातील तरुणांनी त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आता काश्मीरमध्ये अनेक स्थानिक लोक शीख समुदायातील लोकांसाठी मोफत सेवा देऊ केली आहे. देशभरात काश्मीरी तरुणांमा मारहाणीच्या घटना होत असताना त्यांच्या मदतीला धावलेल्या शीख समुदायाला अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने धन्यवाद म्हणत आहेत.

२० फेब्रुवारी संध्याकाळपासून काश्मीरमधील सोशल नेटवर्किंगवर शीख समुदायातील तरुणांसाठी मोफत औषधे, होम स्टे, स्नो बाईक राईड, वैद्यकिय तपासणी, अॅडमिशन, इंग्लीश स्पिकींग कोर्सेससारख्या ऑफर्स स्थानिकांनी पोस्ट करण्यास सुरुवात केली. या ऑफर्सबरोबरच शीख तरुणांसाठी रक्तदान तसेच अगदी किडनी दान करण्यासही काश्मीरी तरुण तयार झालेत.

जम्मू-काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. जैश ए मोहम्मदच्या एका आत्मघातकी हल्लेखोराने १०० किलोची स्फोटके असलेले वाहन सीआरपीएफच्या वाहनाला जाऊन धडकवले होते. यामुळे झालेल्या स्फोटात जवान शहीद झाले होते. सीआरपीएफचे २५०० हजार हून अधिक जवान ७८ वाहनांमधून प्रवास करत असताना दुपारी ३.१५ च्या सुमारास श्रीनगर-जम्मू महामार्गावर दक्षिण काश्मीरच्या अवंतीपुरात परिसरात हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याची बातमी समोर आल्यानंतर देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये नागरिकांना मोर्चे, कॅण्डलाइट मार्च काढून पाकिस्तानचा निषेध केला. काश्मीरमधील स्थानिक तरुणाने हा आत्मघाती दहशतवादी हल्ला केल्याची माहिती समोर आल्यानंतर काही शहरांमध्ये काश्मीरी तरुणांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे देशातील काही भागात काश्मीरी लोकांनी मारहाणीच्या भितीने शहर सोडून पुन्हा काश्मीरमध्ये आले.

एकीकडे सोशल मिडियावरुनही काश्मीरी तरुणांना धडा शिकवण्याची भाषा बोलली जात असतानाच अनेक ठिकाणी शीख समाजातील तरुणांनी काश्मीरी तरुणांना मदतीचा हात पुढे केला. अनेक शहरांमध्ये काश्मीरी तरुणांच्या हॉस्टेलबाहेर शीख तरुणांनी पाहरा दिली. तर अंबाला, देहरादूनसारख्या शहरांमधून शीख तरुणांनी असुरक्षित वाटणाऱ्या काश्मीरी लोकांना परत पाठवण्यासाठी विशेष बसेसची सोय केली होती. अशाप्रकारच्या शीख तरुणांनी काश्मीरी तरुणांना मदत करण्याच्या अनेक बातम्या मागील काही दिवसांपासून समोर आल्यानंतर आता काश्मीरी तरुणांनी शीख तरुणांसाठी मोफत सेवा देण्यास सुरुवात केली आहे. आपण अमुक अमुक क्षेत्रात काम करतो या संदर्भात शीख तरुणांना काही मदत हवी असल्यास माझ्याशी संपर्क साधावा अशाप्रकारचे अनेक ट्विटस काश्मीरी तरुणांनी पोस्ट केले आहेत.

या मदतीबद्दल बोलताना जम्मू आणि काश्मीर विद्यार्थी संघटनेचा प्रवक्ता नासीर खुहेमी म्हणतो, ‘देशात काश्मीरी तरुणांवर काही शहरांमध्ये हल्ले होत असताना शीख तरुणांच्या मदतीशिवाय त्यांना त्या शहरांमधून बाहेर पडता आले नसते. काश्मीरी तरुण सुखरुप घरी घेण्यामध्ये शीख तरुणांचा मोलाचा वाटा आहे.’

युनायटेड किंग्डममधील शीखांनी स्थापन केलेल्या संस्थांनी आमच्याशी संपर्क साधून देशातील देहरादून आणि अंबाला सारख्या शहरांमधून काश्मीरी स्थानिकांना राज्यात परत आणण्यासाठी मदत केल्याचे नासीर सांगतो. युद्ध, नौसर्गिस संकटे, आपत्तीच्या वेळेस या संस्थेमार्फत सामान्य जनतेला त्यांच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून मदत पुरवली जाते. देशभरातील वेगवेगळ्या भागांमधून काश्मीरी तरुणांना मारहाण होण्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आम्हाला अशा तरुणांचे मदतीसाठी फोन येऊ लागले. तेव्हा आम्ही या काश्मीरी तरुणांना त्यांच्या घरी पोहचवण्याची सोय केल्याचे संस्थेचा भारतातील प्रमुख गुरप्रित सिंग सांगतो.

चंढीगड वरुन जवळजवळ ३०० काश्मीरी तरुणांना त्यांच्या राज्यात सुरक्षितरित्या परत पाठवण्यात आल्याने गुरप्रित यांनी सांगितले. स्थानिक गुरुद्वारांमध्ये या काश्मीरी तरुणांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली होती अशीही माहिती गुरप्रित यांनी दिली.

शीख तरुणांनी केलेल्या या मदतीनंतर आता काश्मीरी तरुणांनी त्याची परफेड करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीनगरमध्ये दवाखाना असणाऱ्या इम्तियाज अहमद वाणी याने आपल्या दाखवाण्यात येणाऱ्या शीख रुग्णांना मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. इम्तियाज वर्षभरासाठी शीख रुग्णांची मोफत सेवा करणार आहे. ‘काश्मीरी तरुणांना त्यांच्या राज्यात सुखरुप परत येण्यासाठी मदत करणाऱ्या शीख बांधवांचा मी खूप आभारी आहे. वर्षभरासाठी शीख रुग्णांना मोफत सेवा देऊन मी त्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने धन्यवाद म्हणण्याचा निर्णय घेतला आहे’ असं इम्तियाज सांगतो.

इम्तियाजप्रमाणेच अनंतनागमध्ये स्वत:चे गॅरेज असणाऱ्या मुदाशीर अहमद यांनीही शीख समुदायातील लोकांच्या चारचाकी गाड्या दुरुस्त करुन देण्यासाठी आणि धुण्यासाठी कोणत्याही प्रकारची मजुरी न घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘तुमच्याकडे प्रेमाने कोणी एक पाऊल पुढे टाकत असेल तर तुम्ही दोन पावले पुढे टाकली पाहिजेत यालाच माणुसकी म्हणतात. या माध्यमातून हिंदू, मुस्लिम, शीख बांधवांनी एकत्र येऊन आपल्यातील एकता दाखवून दिली पाहिजे’, असं अहमद सांगतो.

स्थानिक वृत्तपत्रांनीही व्यंगचित्रांच्या माध्यमातून शीख समुदायाला धन्यवाद म्हटले आहे. ग्रेटर काश्मीर नावाच्या वृत्तपत्राने आपल्या व्यंगचित्रामध्ये बोटीत बसलेली शीख व्यक्ती पाण्यात बुडणाऱ्या काश्मीरी तरुणाला हात देतानाचे व्यंगचित्र छापले होते.

काश्मीरमधील ऑल पार्टीज शीख कॉर्निडेशन कमिटीचे अध्यक्ष जगमोहन सिंग रैना यांनी काश्मीरी स्थानिकांच्या प्रेमाबद्दल त्यांना धन्यवाद म्हटले आहे. ‘२०१४ साली पुरपरिस्थितीदरम्यानही स्थानिक काश्मीरी जनतेने आम्हाला मशीदीमध्ये आसरा दिला होता. जेव्हा जेव्हा इथे नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा काश्मीरी लोक मोफत जेवणाची तसेच इतर गोष्टींची सोय करतात. बाहेरचे लोकं काहीही म्हणत असतील पण काश्मीरमधील धर्मनिरपेक्षता आम्हाला ठाऊक आहे,’ असे मत जगमोहन यांनी नोंदवले.

काश्मीरमधील स्थानिकांनी दिलेला प्रतिसाद पाहून खालसा संस्थेनेही आनंद व्यक्त केला आहे. ‘मनुष्याची सेवा करणे याच उद्देशाने आम्ही त्या काश्मीरी तरुणांची मदत केली होती. त्याबदल्यात आम्हाला कोणताही मोबदला अपेक्षित नव्हता. पण ज्याप्रकारे काश्मीरमधील मुस्लिम बांधवांनी तेथील शीख बांधवांना मदत करण्याची तयारी दर्शवली आहे त्यामधून देशामध्ये बंधुता वाढवण्याचा संदेश जाईल याचा आम्हाला आनंदआहे,’ असे मत गुरप्रित सिंग यांनी व्यक्त केल्याचे ‘स्कोल’ या वेबसाईटने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 6:26 pm

Web Title: kashmir sikhs offered free hotel stays car repairs as thanks for communitys help after pulwama
Next Stories
1 नरेंद्र मोदींचें ५५ महिन्यात ९३ परदेश दौरे, २०२१ कोटी रुपये खर्च
2 ‘हल्लेखोर भारतीय, गाडी भारतीय, स्फोटकेही काश्मीरमधली; मग पुलवामा हल्ल्याशी आमचा संबंध काय?’
3 भारतच दहशतवाद पसरवतोय, पाकिस्तानच्या उलट्या बोंबा
Just Now!
X