तब्बल चार महिन्यानंतर काश्मीर खोऱ्यातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. ८ जुलैला पोलीस चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वाणी मारला गेल्यानंतर काश्मीर खोऱ्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. अखेर शनिवारी खोऱ्यातील कार्यालये, शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

काश्मीर खोऱ्यात चार महिन्यानंतर शनिवारी पहिल्यांदाच पेट्रोल पंप, शाळा, दुकाने उघडण्यात आली. काही लोकांनी फुटीरतावाद्यांच्या धमकीनंतरही त्याकडे दुर्लक्ष करत आपले दैनंदिन व्यवहार सुरू ठेवले. संपूर्ण काश्मीर खोऱ्यातील जनजीवन पूर्वपदावर आल्याचे चित्र दिसले. दुसरीकडे फुटीरतावाद्यांनीही आपला विरोध दोन दिवसांपासून कमी केला आहे. त्यामुळे श्रीनगरमधील रस्ते गजबजून गेले होते. तसेच सार्वजनिक परिवहन सेवेच्या बसही रस्त्यावर धावताना दिसत होत्या. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारी कार्यालये, बँका, पोस्ट कार्यालयांमध्ये मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, वाणी मारला गेल्यानंतर काश्मीर खोऱ्यात उफाळून आलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला आहे.