दहशतवादी अफजल गुरूला काल(शनिवार) फाशी देण्यात आली आणि याच पार्श्वभूमीवर कोणताही अनूचितप्रकार घडू नये म्हणून जम्मू-काश्मिरमध्ये शनिवारी संचारबंदी लागू करण्यात आली. सुरक्षेच्या अनुशंगाने आजही जम्मू-काश्मिर परिसरात संचारबंदी कायम आहे. अफजल गुरूला फाशी झाल्यानंतर फुटीरतावादी कार्यकर्ते आणि पोलिस कर्मचा-यांमध्ये झालेल्या संघर्षात ३६ नागरिक आणि २३ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यामुळे काश्मिरमधील काही भागात तणावाचे वातावरण आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस कर्मचारी आणि निमलष्करी दलाच्या जवानांचा महत्त्वाच्या ठिकाणांवरील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, दुस-या दिवशीही मोबाईल आणि इंटरनेट सेवा काश्मिर खो-यात संपुर्णत ठप्प आहेत.दुरदर्शन सेवाही केबल टिव्ही संचालकांमार्फत बंद ठेवण्यात आल्या आहेत. आणि संचारबंदी असल्यामुळे आज सकाळी वृत्तपत्रेही घरोघरी पोहचू शकलेली नाहीत.