काश्मीर खोऱ्यातील युवकांना अनेक शतके चालत आलेल्या सुफी परंपरेपासून तोडून कट्टरवादी बनवण्याच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आखाती राष्ट्रांमधून हवाला निधीच्या मार्गाने पैसा ओतला जात असल्यामुळे सुरक्षा दलांच्या समस्यांमध्ये आणखी भर पडली आहे.

काश्मीर खोऱ्याच्या अनेक भागांमध्ये पसरलेल्या धार्मिक संस्था युवकांना अधिक आकर्षित करत असून, तेथे या युवकांना आयसिस व अल-कायदासारखे दहशतवादी गट अनुसरण करत असलेल्या धर्माची शिकवण दिली जात असल्याचे सुरक्षा दलांचे निरीक्षण आहे. खोऱ्यात अनेक शतकांपासून पालन केले जात असलेल्या सुफी परंपरेपासून युवकांच्या नव्या पिढीची फारकत केली जात असल्याबद्दल अनेक धार्मिक नेत्यांना चिंता वाटत आहे.

जुन्या पिढीतील कुटुंबे पारंपरिक मशिदींमध्ये जाऊन प्रार्थना करत असताना युवक मात्र गेल्या काही वर्षांमध्ये बांधल्या गेलेल्या मशिदींमध्ये नमाज पढण्यास प्राधान्य देत असल्याचे सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.  या नव्या मशिदींना पैसा कुठून मिळतो याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आखाती देशांमधून अवैध पैसा प्रचंड प्रमाणात खोऱ्यात ओतला जात असून त्याची कुठलीही तपासणी होत नसल्याचे लष्कर, पोलीस आणि सुरक्षा दलांना वाटते. याशिवाय, आखाती देशांमध्ये कार्यालये असलेले काही उद्योगसमूह त्यांची मागवलेली उत्पादने वाढवून दाखवतात व हा जादा पैसा खोऱ्यात आणतात, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

काश्मीर खोऱ्यात घडलेल्या दगडफेकींच्या घटनांमध्ये समाजकंटकांकडून ‘आयसिस-जेके’ अशी अक्षरे असलेले झेंडे फडकवले जात असल्याचे सुरक्षा दलांनी पाहिले आहे. हा ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याचे आम्हाला वाटत असले, तरी याच वेळी आम्ही त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत असेही हा अधिकारी म्हणाला.

आखाती देशांमधून हवालाच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात येणारा पैसा, तसेच काश्मिरी तरुणांचे वाढत्या प्रमाणात दहशतवादाकडे ओढले जाणे यामुळे खोऱ्यात दहशतवाद धोकादायकरीत्या वाढत असून, त्यामुळे सुरक्षा दलांना दहशतवादविरोधी मोहिमा राबवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या बेकायदेशीर पैशाला आळा घालायचा असेल, तर सक्तवसुली संचालनालय आणि प्राप्तिकर विभाग यांनी काश्मीरमध्ये येणाऱ्या पैशाच्या ओघावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.