दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील जंगलत मंडी येथे शनिवारी ईदच्या प्रार्थनेनंतर हिंसक आंदोलन झाले. यावेळी ग्रेनेडच्या स्फोटात एका नागरिकाचा मृत्यू झाला. जम्मू-काश्मीर पोलीस आणि निमलष्करी दलाने हिंसक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केला. यामध्ये जवळपास १६ जण जखमी झाले आहेत.

ग्रेनेड स्फोटात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव शीराज अहमद असून तो ब्राकपोराचा रहिवाशी आहे. हँड ग्रेनेडचा हातातच स्फोट झाल्यामुळे मृत्यू झाला असे पोलिसांनी सांगितले. अहमदच्या उजव्या हाताचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले.

केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यात १७ मे रोजी शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर पोलिसांच्या गोळीबारात झालेला हा दुसरा मृत्यू आहे. शुक्रवारी संध्याकाळी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा पथकांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात एका किशोरवयीन तरुणाचा मृत्यू झाला होता.

रमजानच्या काळात काश्मीरमध्ये शांतता रहावी यासाठी केंद्राने दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई थांबवली होती. पण या काळात काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या कारवाया सुरुच होत्या. गुरुवारी ईदच्या सुट्टीसाठी घरी येणाऱ्या एका जवानाचे अपहरण करुन दहशतवाद्यांनी त्याची हत्या केली. पाकिस्ताननेही दुसऱ्याबाजूने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन सीमेवर गोळीबार सुरुच ठेवला.

शनिवारी जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला. नौशेरामध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात विकास गुरुंग हा जवान शहीद झाला.

गुरुंग अवघ्या २१ वर्षांचा होता. गोळीबारात जखमी झालेल्या गुरुंगचे काहीवेळाने निधन झाले. तो मूळचा मणिपूरचा आहे. नौशेरामध्ये भारतीय लष्कराचे जवान गस्तीवर असताना पाकिस्तानने मोर्टार हल्ला केला. त्यामध्ये विकास गुरुंग शहीद झाला. पाकिस्तानने मोर्टार डागून नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांना लक्ष्य केले असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले.