श्रीनगर : ‘ग्रेटर काश्मीर’ या काश्मीरमधील सर्वाधिक खपाच्या इंग्रजी दैनिकासाठी काम करणारे इरफान मलिक यांना बुधवारी रात्री त्यांच्या घरून ताब्यात घेण्यात आले. ते पुलवामा जिल्ह्य़ातील त्रालचे रहिवासी आहेत.

अनुच्छेद ३७० मधील तरतुदी रद्द करून काश्मीरचा विशेष दर्जा मागे घेण्यात आल्यानंतर पत्रकाराबाबतची ही पहिली कारवाई आहे. २६ वर्षांचे इरफान यांच्या दक्षिण काश्मिरातील त्रालमधील निवासस्थानी बुधवारी मध्यरात्री छापा घालून सुरक्षा दलांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना त्रालमधील एका पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

सुरक्षा दलाचे लोक रात्री साडेअकरा वाजता आमच्या घरी आले. इरफान बाहेर येताच त्यांनी त्याला आपल्यासोबत येण्यास सांगितले. त्यांना थेट त्रालमधील पोलीस ठाण्यात नेण्यात आले, असे इरफानचे वडील मोहम्मद अमीन मलिक यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. आम्हाला रात्री त्यांना भेटू देण्यात आले नाही, असेही ते म्हणाले.

इरफानला भेटण्यासाठी आम्ही गुरुवारी सकाळी त्राल पोलीस ठाण्यात गेलो. आपल्याला का ताब्यात घेण्यात आले ते इरफानलाही माहीत नाही, असे त्याची आई हसीना यांनी सांगितले. माझ्या मुलाने काही चुकीचे केलेले नसल्यामुळे त्याला सोडून द्यावे, असे आवाहन मी पोलीस अधिकाऱ्यांना करते, असे त्या म्हणाल्या.