काश्मीरी पंडित हे काश्मीरचा अविभाज्य भाग आहेत. जम्मू-काश्मीर राज्य त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे एके दिवशी ते आपल्या मुळ घरी परततील अशी आशा नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केली आहे.


अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे फारुख अब्दुल्ला यांनी यावेळी काश्मीरमधून विस्तापित झालेल्या काश्मीरी पंडितांबाबत दिलासादायक वक्तव्य केले आहे. काश्मीरी पंडित हे राज्याचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्याशिवाय काश्मीर अपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नुकतेच अब्दुल्ला यांनी पंडित नेहरु, मौलाना आझाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, मोहम्मद अली जिना यांच्यामुळे भारताची फाळणी झाली नाही तर पंडित नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे देशाची फाळणी झाली असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले होते.

भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती व्हावी ही मोहम्मद अली जिना यांची भूमिका नव्हती. मुस्लिम, शिख आणि इतर अल्पसंख्याकाना विशेषाधिकार दिला पाहिजे यासाठी एक समिती स्थापण्यात आली होती. मोहम्मद अली जिना यांनी विशेषाधिकार समितीच्या मागणीला पाठिंबा दिला होता. मात्र, त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार पटेल यांनी हा विशेषाधिकार दिला नाही. त्यामुळे नाईलाजाने फाळणी करावी लागली असेही अब्दुल्ला यांनी म्हटले होते.