पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामुळे दिल्लीतील अनेक काश्मिरी विद्यार्थी भीतीच्या छायेत वावरत असून त्यांची सुरक्षा वाढवण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

प्रसारमाध्यमातील बातम्यांनुसार देशाच्या इतर भागात राहाणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांच्या छळवणुकीचे काही प्रकार सामोरे आले असून काही ठिकाणी त्यांच्यावर हल्ले करण्यात आले आहे. जामिया मिलिया इस्लामिया संस्थेतील काश्मिरी विद्यार्थ्यांने सांगतिले,की विचार काहीही असले तरी केवळ काश्मिरी असल्याने आमच्या जिवाला धोका आहे. देशभरात हेच घडत आहे. डेहराडून, बंगळुरू, अंबाला येथे काश्मिरी विद्यार्थ्यांना घाबरवण्याचे प्रकार सुरू आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कार्यकर्त्यां सेहला रशीद या काश्मीरच्या असून त्यांनी सांगितले,की देशभरात काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ले करण्यात येत आहेत, त्यांना शिवीगाळ करून खोटे  गुन्हे दाखल केले जात आहेत. पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचे निमित्त पुढे करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली विद्यापीठातील काश्मिरी विद्यार्थी अनिस अहमद याने सांगितले, की आम्ही समाजमाध्यमांवरील टिप्पण्यांना उत्तरे दिलेली नाहीत तरी आम्हाला दहशतवादी ठरवले जात आहे. भाडयाने राहणाऱ्या विद्यार्थ्यांना घरे सोडण्यास भाग पाडण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त मधुर वर्मा यांनी सांगितले, की दिल्लीत अल्पसंख्याक समाजाचे लोक राहत असलेल्या भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्त वाढवला आहे.  काश्मिरींसह सर्वानाच सुरक्षा दिली आहे.

काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी संपर्क सुविधा

बंगळुरू येथे शिकणाऱ्या एका काश्मिरी विद्यार्थ्यांला शनिवारी जैशच्या दहशतवाद्याचे अभिनंदन केल्यावरून अटक करण्यात आली, तर डेहराडून येथे पुलवामा हल्ल्याचे समर्थन करणाऱ्या व्हॉटसअ‍ॅप संदेशामुळे एका विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. सीआरपीएफने अ‍ॅट सीआरपीएफ मददगार ही सेवा सुरू केली असून त्यात १४४११ या क्रमांकावर काश्मिरी विद्यार्थी फोन करू शकतात व ७०८२८१४४११ या क्रमांकावर एसएमएस पाठवू शकतात.  त्यांना त्यावरून मदत केली जाईल.

आनंदाचा संदेश पाठवणाऱ्या चार विद्यार्थिनी निलंबित

जयपूर : राजस्थानातील एका खासगी संस्थेच्या निम्न वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या चार विद्यार्थिनींना पुलवामातील हल्ल्याचा आनंद साजरा करून त्याची छायाचित्रे व्हॉट्सअ‍ॅपवर टाकल्याच्या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहेत. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सच्या दुसऱ्या वर्षांच्या विद्यार्थिनी तवलीन मंझूर, इकरा, झोहरा नझीर व उझमा मझीर यांनी  पुलवामा हल्ल्यानंतर आनंद साजरा करून व्हॉट्सअ‍ॅपवर छायाचित्रे टाकली व नंतर ती पोस्ट व्हायरल झाली होती. नंतर या विद्यार्थिनींना निलंबित करण्यात आले. संस्थेच्या कुलसचिवांनी म्हटले आहे, की या मुलींनी देशविरोधी संदेश व्हॉट्सअ‍ॅप टाकून पुलवामा हल्ल्याबाबत आनंद व्यक्त केला.

उत्तराखंडमध्येही विद्यार्थ्यांस अटक

डेहराडून : काश्मिरी विद्यार्थ्यांनी पुलवामा हल्ल्याबाबत समाजमाध्यमांवर प्रक्षोभक विधाने करू नयेत, असे आवाहन उत्तराखंड पोलिसांनी रविवारी केले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर एका काश्मिरी  विद्यार्थ्यांने हा पबजीसारखा गेम आहे असे सांगून समाजमाध्यमावर हल्ल्याचे समर्थन केले होते, त्यामुळे त्याच्यावर गुन्हा करून त्याला अटक केली आहे.  अतिरिक्त पोलिस महासंचालक अशोक कुमार यांनी सांगितले, की पुलवामा हल्ल्यानंतर लोकांच्या मनात संताप आहे.