जम्मू-काश्मीरमध्ये सैन्यावर दगडफेक झाल्याच्या बातम्या अनेकदा वाचनात येतात. मात्र पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाला सणसणीत चपराक लावणारी एक घटना गुरुवारी श्रीनगरमध्ये घडली. दक्षिण काश्मीरमधील काही तरुणांनी परिसरात लावलेले बुरहान वानी आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे पोस्टर्स फाडून टाकले. काही स्थानिकांनी तरुण मुले पोस्टर फाडतानाचे फोटो काढल्यानंतर ही घटना समोर आली आहे. यामधून स्थानिक तरुणांनी पाकिस्तानला ‘आता पुरे’ असा थेट इशारा दिला आहे.

टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार पोस्टर्सच्या माध्यमातून स्थानिक पोलिसांना धमक्या देण्यात आल्या होत्या. तसेच स्थानिक तरुणांनी दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी व्हावे असेही आवाहन या पोस्टरमधून करण्यात आले होते. या परिसरातील नागरिकांनी स्थानिक निवडणुकांमध्ये सहभागी होऊ नये अशी धमकीही या पोस्टर्समधून देण्यात आली होती. मात्र या सर्व धमक्यांना न जुमानता तरुणांनी ते पोस्टर्स फाडून फेकून देत आम्हाला पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांकडून काहीच नकोय आम्ही त्यांच्या विरोधात आहोत हा संदेश दिला आहे.

जम्मू-काश्मीरमधील २५९ तरुण मागील महिन्यामध्ये भारतीय लष्कराचा भाग असणाऱ्या जम्मू काश्मीर लाइट इन्फेट्री (जेकेएलआय) या तुकडीत सहभागी झाले आहेत. श्रीनगरमधील रंगरीथ येथे एका वर्षाचे प्रशिक्षण या सर्वांना देण्यात आले आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी, ‘मागील काही काळापासून काश्मीरमधील तरुणांचे दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होण्याचे प्रमाण कमी झाले आहे’ असे मत व्यक्त केले होते.