ब्रिटनचे राजपुत्र विल्यम आणि युवराज्ञी केट मिडलटन यांना पुत्ररत्न झाल्याने ब्रिटनच्या राजघराण्यात सध्या आनंदोत्सव साजरा होत आहे. या शाही दाम्पत्याचं हे तिसरं अपत्य असून बाळबाळंतीण सुखरूप असल्याची माहिती आहे. केसिंग्टन पॅलेसतर्फे ही माहिती देण्यात आली आहे. आज (सोमवार) सकाळी केटला लंडनच्या सेंट मेरीज रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या महिन्याच्या सुरुवातीपासूनच बाळाच्या आगमनाची तयारी सुरू झाली होती. ज्या रुग्णालयात केट बाळाला जन्म देणार त्याच्या आजूबाजूच्या परिसरात पार्किंगला मनाई करण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आलं होतं. तर केटला रुग्णालयात दाखल केल्यापासूनच रुग्णालयाबाहेर प्रसारमाध्यमांनी गर्दी केली होती. याआधी केटने प्रिन्स जॉर्ज आणि प्रिन्सेस शेरलॉटला याच रुग्णालयात जन्म दिला होता. नवजात शिशू हा राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा सहावा पुतणा असून राजघराण्याचा पाचवा वारस आहे.

शाही बाळाचं नाव अद्याप पॅलेसकडून जाहीर करण्यात आलं नसून ब्रिटीश बुकमेकर्सतर्फे अल्बर्ट, आर्थर, फ्रेडरिक, जेम्स आणि फिलीप या नावांना पसंती देण्यास आली आहे.