कठुआमध्ये ८ वर्षीय मुलीसोबत अत्यंतिक शारीरिक छळ करुन बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळावी अशीच देशातील प्रत्येक नागरीकाची इच्छा आहे. आरोपी दीपक खजुरियाच्या नियोजित वधू रेणू शर्माला एकदा दीपकला भेटायचे आहे. २४ वर्षीय रेणूला दीपकच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारायचे आहेत. ‘मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून या गुन्ह्यात तू सामील आहेस का हा प्रश्न विचारेन. मला माहितीये तो मला खरं उत्तर देईल. जर तो या प्रकरणात सामील नसेल तर मी आज जन्म त्याची वाट पाहिन. पण जर त्याने हा अक्षम्य गुन्हा केला असेल तर मी माझ्या पालकांना दुसरा मुलगा पाहायला सांगेन,’ असं रेणू म्हणाली.

यानंतर रेणू म्हणाला की, ‘मी दीपकला फक्त एकदाच भेटली, तेही आमच्या साखरपुड्याच्या दिवशी. याआधी आणि नंतर मी दीपकला कधीही भेटली नाही. आमचं फोनवरच बोलणं व्हायचं. आता त्याच्याबद्दल जसं बोललं जात आहे तसा मला दीपक कधीच वाटला नाही. त्याने मला एकदा व्हिडिओ चॅटबद्दल विचारले होते. मी मात्र नकार दिला. पण त्याने कधीही जबरदस्ती केली नाही. खरं खोटं मला माहित नाही. न्यायव्यवस्था योग्य तो निर्णय घेईल. ‘

मात्र रेणूला दीपकला भेटवण्यास मनाई करण्यात आली. ‘अजून मी माझ्या मुलाला भेटू शकले नाही, त्यामुळे रेणूला आता दीपकला भेटवणे योग्य ठरणार नाही.’ असे दीपकची आई दर्शनादेवी म्हणाल्या. गेल्यावर्षी ७ डिसेंबरला दीपक खजुरिया आणि रेणू शर्माचा साखरपुडा झाला होता. यावर्षी २६ एप्रिलला दोघं विवाहबंधनात अडकणार होते. मात्र आता दीपकच्या लग्नावर टांगती तलवार उभी राहिली आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात निवृत्त सरकारी अधिकारी संजी राम हा या प्रकरणाचा सूत्रधार आहे. संजी रामनेच बलात्कार आणि हत्येचा कट रचला. संजी रामने त्याच्या पुतण्याला मुलीचे अपहरण करायला सांगितले. पीडित मुलगी नेहमीच जंगलात चारा घेण्यासाठी यायची. १० जानेवारीला पीडित मुलगी चारा शोधत असताना रामच्या अल्पवयीन पुतण्याने तिला गाठले. त्याने पीडित मुलीला गप्पाच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले. यानंतर त्याने पीडितेला बेशुद्ध केले आणि तिच्यावर बलात्कार केला. यावेळी दीपकने साथीदारांना मुलीची हत्येसाठी काही वेळ थांबा. मलाही तिच्यावर अत्याचार करायचे आहे, असे सांगितले होते, अशी माहिती या आरोपपत्रात देण्यात आली आहे.