Kathua gang rape and murder case: जम्मू-काश्मीरमधील कथुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात पठाणकोटमधील सत्र न्यायालयाने तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर तिघांना पाच वर्ष कैद सुनावण्यात आली आहे. संजी राम, परवेश कुमार आणि दीपक खजुरीया या तिघांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. आज सकाळी न्यायालयाने सात पैकी सहा आरोपींना दोषी ठरवले तर एका आरोपीला सबळपुराव्याअभावी दोषमुक्त केले.

कथुआ येथील आठ वर्षांच्या मुलीचे घरातून १० जानेवारी २०१८ रोजी अपहरण झाले होते. तिला आठ दिवस एका मठात ओलीस ठेवण्यात आले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि अघोरी धार्मिक विधीही केले गेले. त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आठवडाभरानंतर तिचा मृतदेह याच जंगलात आढळला होता. या सामूहिक बलात्कार प्रकरणाने देशाला हादरवून सोडले होते.

सुप्रीम कोर्टाने या खटल्याची सुनावणी जम्मू- काश्मीरबाहेर घेण्याचे आदेश दिले होते. यानुसार पठाणकोटमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. ३ जूनला या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती. या प्रकरणात एकूण ११४ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. सोमवारी न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला. न्यायालयाने सात पैकी सहा आरोपींना दोषी ठरवले आहे. मुख्य आरोपी सांजी राम,  दीपक खजुरिया, सुरेंदर वर्मा, तिलक राज, आनंद दत्ता, परवेश कुमार या सहा जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर सांजी रामचा मुलगा विशाल याला न्यायालयाने दोषमुक्त केले.

या प्रकरणात पोलिसांनी एकूण आठ आरोपींना अटक केली होती. यातील एक आरोपी हा अल्पवयीन असून हे प्रकरण जम्मू- काश्मीरमधील हायकोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे आठ पैकी सात आरोपींविरोधात पठाणकोटमधील न्यायालयात सुनावणी झाली.