जम्मू- काश्मीरमधील कथुआ सामूहिक बलात्कारप्रकरणी १० जून रोजी न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे. पठाणकोटमधील न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू असून विशेष सरकारी वकील जे के चोप्रा यांनी ही माहिती दिली.

कथुआ येथील आठ वर्षांच्या मुलीचे घरातून १० जानेवारी २०१८ रोजी अपहरण झाले होते. तिला आठ दिवस एका मठात ओलीस ठेवण्यात आले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि अघोरी धार्मिक विधीही केले गेले. त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आठवडाभरानंतर तिचा मृतदेह याच जंगलात आढळला होता. या सामूहिक बलात्कार प्रकरणाने देशाला हादरवून सोडले होते.

सुप्रीम कोर्टाने या खटल्याची सुनावणी जम्मू- काश्मीरबाहेर घेण्याचे आदेश दिले होते. यानुसार पठाणकोटमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु होती. जून २०१८ मध्ये या खटल्याच्या नियमित सुनावणीला सुरुवात झाली. ही सुनावणी इन कॅमेरा झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली होती. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश होता. आठ पैकी सात आरोपींविरोधात हत्या, बलात्कार या कलमांखाली आरोप निश्चित करण्यात आले असून अल्पवयीन आरोपीच्या वयाचा वाद सध्या जम्मू- काश्मीर हायकोर्टात प्रलंबित आहे.