कठुआ बलात्कार प्रकरणात आरोपींचा बचाव करणाऱ्या भाजपाच्या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त एनडीटीव्ही वाहिनीने दिले आहे. जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये आठवर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेबद्दल संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली आहे. लोकांचा वाढता दबाव आणि पक्षाच्या प्रतिमेला बसणारा फटका लक्षात घेऊन त्या दोन मंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगितला होता असे सूत्रांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सुद्धा एकत्र सरकार चालवणे कठिण असल्याचे भाजपा नेतृत्वाला स्पष्ट केले आहे. जम्मू-काश्मीर भाजपा प्रदेशाध्यक्षांकडे त्या दोन मंत्र्यांनी आपले राजीनामे सोपवले आहेत. उद्या जम्मू-काश्मीरमधल्या भाजपाच्या आमदारांची बैठक होणार असून त्यावेळी अंतिम निर्णय घेण्यात येईल. पीडीपी आणि भाजपा आघाडीचे शिल्पकार भाजपा नेते राम माधव या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

उद्योग मंत्री चंद्र प्रकाश गंगा आणि वन मंत्री लाल सिंह यांनी मार्च महिन्यात हिंदू एकता मंचच्यावतीने आरोपींच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या सभेला संबोधित केले होते. या हिंदू एकता मंचने राष्ट्रध्वज हाती घेऊन रॅली सुद्धा काढली होती. या बलात्कार प्रकरणाला त्यांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी काही भाजपा नेत्यांनी पाठिंबा सुद्धा दिला होता.