जम्मू- काश्मीरमधील कठुआ येथील बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी गाव सोडल्याचे वृत्त आहे. जम्मू- काश्मीर बार असोसिएशनमधील वकिलांनी पोलिसांनी बळाचा वापर केल्याच्या आरोपावरुन आंदोलन सुरु केले होते. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी भीतीपोटी गाव सोडल्याचे वृत्त आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही.

जम्मू- काश्मीरमधील कठुआ येथील रासना खेड्यात ८ वर्षांच्या चिमुरडीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना जानेवारीत घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी नुकतेच आरोपपत्र दाखल केले होते. आरोपपत्रात नराधमांनी केलेले दुष्कृत्य समोर आले होते.
जम्मू- काश्मीर पोलिसांनी सोमवारी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. आरोपपत्र दाखल करताना जम्मू- काश्मीर बार असोसिएशनच्या वकिलांनी विरोध केला होता. वकील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न का करत आहे, असा संतप्त सवाल पीडित मुलीच्या वकिलांनी केला होता.

बलात्कार प्रकरणाला धार्मिक रंग
बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी अल्पसंख्याक बकरावाल समाजाची असून आरोपी हे हिंदू धर्माचे आहेत. बकरावाल समाजाला गावाबाहेर काढण्यासाठी हिंदूंचे प्रयत्न सुरु असतात, असा आरोप आहे. विशेष म्हणजे, बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या बचावासाठी हिंदुत्ववादी संघटनाचे नेते पुढे आले होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाने धार्मिक वळण घेतले.

कुटुंब अज्ञातस्थळी रवाना
कठुआमधील वातावरण तापले असतानाच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी भीतीपोटी गाव सोडले आहे. पीडित मुलीचे वडील, आई आणि तिचे दोन भाऊ अज्ञातस्थळी रवाना झाल्याचे काही इंग्रजी वृत्तपत्रांनी म्हटले आहे.