दशकभरापूर्वी एका अपघातात रासना खेड्यात राहणाऱ्या एका दाम्पत्याने दोन मुलींना गमावले… घरात मुलगी हवी म्हणून या दाम्पत्याने बहिणीची मुलगी दत्तक घेतली. मात्र, नियतीच्या क्रूर खेळ म्हणा किंवा काही नराधमांची विकृत वासना…. त्या दत्तक घेतलेल्या मुलीचीही हत्या झाली आणि त्या दाम्पत्याची मुलगी पुन्हा हिरावली गेली. रासना खेड्यातील बलात्कार पीडितेच्या आई- वडिलांवर ओढावलेला हा दुर्दैवी प्रसंग.

कठुआमधील आठ वर्षांच्या चिमुरडीची नराधमांनी बलात्कारानंतर हत्या केली होती. त्या चिमुरडीला तिच्या कुटुंबीयांनी दत्तक घेतल्याचे समोर आले आहे. तिचे वडिल सांगतात, मी तिला बहिणीकडून दत्तक घेतले होते. ती तीन महिन्यांची होती आणि माझ्या दोन मुलींचा अपघातात मृत्यू झाला. म्हणून मी तिला बहिणीकडून दत्तक घेतले.

पीडितेच्या जन्मदात्या वडिलांनी (बायोलॉजिकल फादर) यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला प्रतिक्रिया दिली. ‘मला चार मुलं होती. तर मुलींच्या मृत्यूनंतर ते दाम्पत्य निराश होते. त्यांच्या आयुष्यात आनंद परतावा, यासाठी मी मुलीला दत्तक दिले, असे जन्मदात्या वडीलांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी त्यांची मोठी मुलगी ८ वर्षांच्या पीडितेला भेटायला आली. तिने बहिणीला घरी परतायला सांगितले. यानंतर आठ वर्षांची मुलगी तिच्या दत्तक घेतलेल्या आईच्या मागे जाऊन लपली. मी गेले तर आई एकटी पडेल आणि जनावरांना चरायला बाहेर कोण नेईल, असे विचारत तिने घरी परतण्यास नकार दिला.

दरम्यान, तिला दत्तक घेणाऱ्या दाम्पत्यानेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोण हिंदू कोण मुसलमान हे त्या छोट्या मुलीला कसे माहिती असणार?.. त्यांना बदला घ्यायचाच होता तर, निष्पाप चिमकुलीवर का अत्याचार केले?.. तिला हात कुठला पाया कुठला हे देखील तिला समजत नव्हते.. डावा हात कुठला आणि उजवा कुठला हेही तिला ठाऊक नव्हते’, अशा शब्दांत त्यांनी आपली व्यथा बोलून दाखवली.