यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार ब्रिटीश लेखक काझुओ इशिगोरो यांना जाहीर झाला आहे. ‘नॉवेल्स ऑफ ग्रेट इमोशनल फोर्स’ या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

या पुरस्कारासाठी मार्गारेट अॅटवूड, नूगी वा थिओंगो आणि हरुकी मुराकामी हे लेखकही शर्यतीत होते. मात्र, नोबेलवर अखेर इशिगोरो यांचे नाव कोरले गेले. जगाशी जोडल्या गेलेल्या भ्रामक भावनांचा उलगडा त्यांनी आपल्या ‘नॉवेल्स ऑफ ग्रेट इमोशनल फोर्स’ या पुस्तकातून केल्याचे स्वीडिश अॅकेडमीने सांगितले आहे.

इशिगोरो (वय ६४) यांचा जन्म जपानमध्ये झाला असून ते पाच वर्षांचे होते तेव्हा त्यांचे कुटुंबिय युकेमध्ये स्थलांतरित झाले. इशिगोरो यांनी लिहीलेले ‘द रिमेन्स ऑफ दि डे’ (१९८९) या प्रसिद्ध कादंबरीवर एक सिनेमाही येऊन गेला आहे. इशिगोरो यांनी आठ पुस्तके लिहीली आहेत. त्याचबरोबर त्यांनी सिनेमा आणि टिव्ही कार्यक्रमांसाठी लेखनही केले आहे.

यापूर्वी तीन टप्पात नोबेल पुरस्कार जहीर झाले. यात जेफरी सी. हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल डब्लू. यंग या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर झाला. तर, गुरुत्वीय लहरींच्या संशोधनासाठी रेनर वेईस, बॅरी बॅरीश, कीप थॉर्न या संशोधकांना नोबेल विभागून देण्यात आला. तसेच जॅक्स डबोके, ओकाईम फ्रँक, मायकल हेंडरसन या तिघांनाही रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर झाले.