देशातील २९ वे राज्य म्हणून सोमवारी तेलंगण राज्याची निर्मिती करण्यात आली आणि नव्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून तेलंगण राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव यांना राज्यपाल नरसिंहन यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. राव यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षांव करण्यात आला. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करून एक आदर्श राज्य अशी तेलंगणची प्रतिमा तयार करण्याचा निर्धार राव यांनी व्यक्त केला. लोककल्याण आणि विकास हे आपल्या सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. तेलंगण राज्य केवळ केंद्र सरकारबरोबरच नव्हे, तर शेजारी राज्यांसमवेतही सौहार्दाचे संबंध ठेवील, पारदर्शक कारभारासाठी राजकीय भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासही प्राधान्य दिले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. राव यांच्याबरोबर ११ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये त्यांचा मुलगा आणि पुतण्याचा समावेश आहे. तसेच दोन उपमुख्यमंत्री नियुक्त करण्यात आले आहेत.

हैदराबादमध्ये १० हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार
हैदराबादमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची टेहळणी यंत्रणा अस्तित्वात यावी या उद्देशाने तेथे लवकरच १० हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे राव यांनी जाहीर केले. हैदराबादला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. हे शहर जागतिक दर्जाचे करावयाचे असून कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य देऊ.