उत्तराखंडमधील उत्पातातही केदारनाथ मंदिराची हानी मात्र अत्यंत किरकोळ झाली आहे, असे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या पाहणीत उघड झाले आहे.
मंदिराच्या बाहेरच्या भिंतीचे किरकोळ नुकसान झाले आहे. मंदिराच्या ज्या भागाला शिलाखंड लागले तेथे ही किरकोळ हानी दिसत आहे, असे या विभागाचे सरसंचालक बी. आर. मणि यांनी सांगितले.पुरातत्त्व विभागाचे संचालक जान्हविज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पाचजणांच्या पथकाने दोन आणि तीन ऑगस्टला मंदिराची कसून पाहणी केली. मंदिराच्या आवारातून चिखल काढताना काही शिल्पेही सापडली आहेत. संरक्षित वास्तू म्हणून या मंदिराची जबाबदारी पुरातत्त्व विभागाकडे नसल्याने या मंदिरातील शिल्पांची नोंद विभागाकडे नाही. त्यामुळे ही शिल्पे मंदिरातील आहेत की अन्य कुठून वाहात आली आहेत, याचा तपास सुरू आहे, असेही मणि यांनी सांगितले. मंदिराच्या हानीचा आढावा घेतला जात असून दुरुस्तीसाठीच्या खर्चाचा अंदाज सांस्कृतिक खात्याला कळविला जाईल, असेही ते म्हणाले.