बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असणाऱ्या येथील श्री केदारनाथ देवस्थानाची यात्रा आणखी आठवडाभर टाळण्याचा सल्ला या मंदिराचे मुख्य पुजारी भीमाशंकर यांनी दिला आहे. लिंचौली ते केदारनाथदरम्यानचा रस्ता अद्यापही असुरक्षित असल्याने त्यांनी भाविकांना हे आवाहन केले आहे.
गेल्या वर्षी जूनमध्ये नद्यांना पूर आल्याने केदारनाथ देवस्थानाची अपरिमित हानी झाली होती. यात हजारो भाविकांनी प्राण गमावले होते. केदारनाथपर्यंतचे रस्तेही उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या डागडुजीचे काम अद्याप सुरू आहे.  गेल्या आठवडय़ात केदारनाथ यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर अनेक भाविकांनी या ज्योतिर्लिगाचे दर्शन घेतले, तसेच दररोज हजारो भाविकांचे जथ्थे येथे दाखल होत आहेत. मात्र, या देवस्थानाला भेट देणे अद्याप धोकादायक आहे, असे भीमाशंकर यांनी वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीला दूरध्वनीवरून सांगितले.
ते म्हणाले, लिंचौलीपासून केदारनाथला येणाऱ्या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, या रस्त्याची मातीही ओली आहे आणि बर्फाचे साम्राज्य असल्याने या रस्ता उभारणीमध्ये अडचणी येत आहेत. आणखी सात ते आठ दिवसांनंतर बर्फ वितळू लागेल आणि रस्ते उभारणीच्या कामाला वेग येईल, त्यामुळे भाविकांनी एक आठवडा ही यात्रा टाळावी.
भीमाशंकर यांनी उत्तराखंड सरकारच्या मदत कार्याचे या वेळी कौतुक केले. हे देवस्थान पूर्ववत व्हावे, यासाठी हरीश रावत यांच्या सरकारने चांगले मदत कार्य केले आहे.
भाविकांना येथे उतरण्याची तसेच खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था त्यांनी केली आहे. मात्र, रस्त्याचे काम अडले असून तेही लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.