टीम इंडियाचा अष्टपैलू आणि स्टार खेळाडू केदार जाधव याने यंदाच्या दिवाळीत एक चांगला आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला आहे. दुष्काळग्रस्तांना मदत करुन त्याने स्वतःमधील कर्तव्यभावना आणि समाजिक भान जपले आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करुन त्याने त्यांचे अनेक आशिर्वाद मिळवले आहेत. यंदा कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाल्याचा मोठा आनंद त्याला असला तरी त्याच्यातील सामाजिक जाण हा आनंद द्विगुणित करणारी आहे.

मराठवाड्यात यंदा दुष्काळी स्थिती असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे केदारने आपल्या अन्नदात्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. उस्मानाबद जिल्ह्यातील ‘शिवार संसद’ या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेला केदारने मोठी आर्थिक मदत देऊ केली आहे. गेल्या वर्षीही त्याने शेतकरी मेळावा भरवण्यासाठी या संस्थेला मदत दिली होती. स्तंभलेखक सुनंदन लेले यांनी एका मराठी दैनिकात केदारच्या या दातृत्वावर लेखन केले आहे.

क्रिकेट सामन्यांच्या दौऱ्यादरम्यान व्यस्त असतानाही केदारला राज्यातील स्थितीबाबत माहिती कशी असा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण होऊ शकतो. त्यावर खुद्द केदारनेच उत्तर दिले आहे. केदार म्हणातो, दौऱ्यांदरम्यान मी फिरतीवर असलो तरी महाराष्ट्रात काय सुरु आहे याकडे माझी नेहमीच नजर असते. त्यातूनच यंदा मराठवाड्यात त्यातही उस्मानाबादेत कमी पाऊस झाल्याची माहिती मला मिळाली. तसेच शेतकऱ्यांप्रती आस्था असल्याने मी त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थेला मदत देऊ केली. मात्र, मी खूप मोठे काम केले आहे असे मला आजिबात वाटत नाही, असेही त्याने म्हटले आहे.