चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना या पक्षाने त्यांच्या सदस्यांना कॉमरेड असेच संबोधण्याचा आदेश काढला आहे. त्यांना या शब्दासाठी पर्यायी शब्द न मिळाल्याने कॉमरेड शब्दाला पुन: महत्त्व आले आहे. कम्युनिस्ट पक्षाने सदस्यांनी एकमेकांना कॉमरेड संबोधण्यास सांगितले आहे.
‘अलीगड’ला अनुदान
अलिगड : येथील अलिगड मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरू निवृत्त ले.ज. जमीरूद्दीन शाह यांनी आता केंद्राकडे वाचनालय विस्तारासाठी २० कोटींचे अनुदान मागितले आहे. मौलाना आझाद मध्यवर्ती वाचनालयातील २८,००० विद्यार्थ्यांना सुविधा देण्यासाठी अनुदान देणे आवश्यक आहे असे त्यांनी म्हटले आहे. १९५८ मध्ये वाचनालय सुरू झाले.
दोन बॉम्बस्फोटात तिघे जखमी
बरासत/माल्डा : पश्चिम बंगालमध्ये दोन बॉम्बस्फोटांमध्ये तीन जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मोहनपूरमध्ये पहिल्या घटनेत दोन बांधकाम कामगार गंभीररीत्या जखमी झाले. हा बॉम्ब वाळूखाली छोटय़ा डब्यात लपवण्यात आला होता. हा डबा उचलल्यानंतर काही क्षणांत स्फोट होऊन दोघे जखमी झाले, तर माल्डा जिल्ह्यात आलमपूर मासळी बाजारात कच्च्या बॉम्बचा स्फोट होऊन एक जण जखमी झाला. तिघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फेसबुकचे नवे अ‍ॅप
न्यूयॉर्क  : फेसबुकने एक नवे ग्रुप्स अ‍ॅप सुरू केले असून त्याच्या आधारे समान छंद, समान भूप्रदेश व संस्कृती असलेले लोक संबंधित गटांशी संपर्कात राहू शकतील. फेसबुक इनकॉर्पोरेशनने मोबाइल फोन्सवर आपले अस्तित्वात वाढ करण्याचे ठरवले असून त्यांनी या आधी मेसेंजर, पेपर, इन्स्टाग्राम व व्हॉट्सअ‍ॅप इतरांकडून विकत घेतली आहेत. यातील पेपर हे मोबाइलवर बातम्या वाचण्याचे अ‍ॅप आहे व स्लिंग शॉट हे संदेश पाठवण्याचे अ‍ॅप आहे. मेसेंजर हे मूळ फेसबुकचे नसलेले अ‍ॅप चांगले चालले आहे. फेसबुकच्या मते १.३५ अब्ज वापरकर्त्यांपैकी ७० कोटी लोक ग्रुप्स हे अ‍ॅप वापरतात. यात ग्रुपचा शॉर्टकटही स्क्रीनवर तयार करता येतो.
इबोलाचे रुग्ण घटणार
जीनिव्हा : पुढील वर्षांच्या सुरुवातीला इबोला रुग्णांची संख्या घटण्याची शक्यता असून तरीही गाफील न राहता निदान चाचण्या विकसित केल्या पाहिजेत, असे मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केले आहे. संघटनेचे अधिकारी पिअप फॉरमेंटी यांनी सांगितले, की येत्या चार ते सहा महिन्यात रुग्णांची संख्या कमी होईल. आतापर्यंत या रोगाने पश्चिम आफ्रिकेत ५२०० बळी घेतले आहेत. इबोला संपला असे आम्ही म्हणत नाही पण मार्चपर्यंत गिनीया, लायबेरिया व सिएरा लिओन या देशातील स्थिती बदललेली असेल.
माजी मंत्र्यास अटक
अथेन्स : ग्रीसचे माजी अर्थ व संरक्षणमंत्री यानोस पापनतोनिओ व त्यांची पत्नी स्टॅवरूला कौराको यांना स्वीस बँकेतील खात्यात १५ लाख अमेरिकी डॉलर इतकी रक्कम असलेले खाते जाहीर न केल्याने चार वर्षे तुरुंगवास व १० हजार युरो दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. हे दांपत्य या शिक्षेवर अपील करू शकते. मंत्री पापनतोनिओ ६५ वर्षांचे आहेत ते १९९६ ते २००१ दरम्यान अर्थमंत्री होते तर २००१ ते २००४ दरम्यान संरक्षणमंत्री होते.
तिघांना अटक
बंगळुरू: एका मुलीची छेडछाड रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या मणिपुरी विद्यार्थ्यांस मारहाण केल्याप्रकरणी तीन इसमांना गुरुवारी अटक करण्यात आली. मद्यपान केलेल्या या तिघा इसमांनी सदर तरुणीची छेडछाड करून तिच्याबद्दल अश्लील शेरेबाजीही केली.  त्यावेळी तेथून जात असलेल्या या २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता.