जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शुक्रवारी राज्यातील राजकीय नेत्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यांनी जम्मू-काश्मीरमधील नेत्यांना शांतता राखण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. राज्यपाल मलिक यांनी मेहबूबा मुफ्ती, शाह फैझल, सज्जाद लोन आणि इम्रान अन्सारी यांची भेट घेतली.

जम्मू-काश्मीर प्रशासनाने अॅडव्हायजरी जारी केल्यानंतर खोऱ्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही भिती दूर करण्यासाठी तातडीची बैठक बोलवण्यासाठी या नेत्यांनी राज्यपालांशी संपर्क साधला होता. जम्मू-काश्मीर प्रशासनाने शुक्रवारी अमरनाथ यात्रेकरुंसाठी सुरक्षा अॅ्डव्हायजरी जारी केली. खोऱ्यात दहशतवादी हल्ला होण्याचा धोका असल्यामुळे अमरनाथ यात्रेकरुंना तातडीने काश्मीर सोडण्याच्या सूचना केल्या.

अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्यासंबंधी सुरक्षा यंत्रणांकडे खात्रीलायक माहिती उपलब्ध आहे असे राज्यपाल मलिक यांनी शिष्टमंडळाला सांगितले. पूर्णपणे सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपायोजनांना संबंध नसलेल्या विषयाशी जोडले जात असून त्यांनी राजकीय नेत्यांना शांतता बाळगण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.