महिला सक्षमीकरणासाठी अशासकीय संस्थेमध्ये काम करणाऱ्या पाटण्यातील महिलेला संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्याकडून लैंगिक छळास सामोरे जावे लागल्याची घटना उघड झाली आहे. बिहारमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या एका प्रकल्पामध्ये एका एनजीओतर्फे ही महिला काम करते. या कामाच्या पाहणीसाठी विदेशातून एक अधिकारी आला होता आणि त्यानं या महिलेला मला खूश केलंस संयुक्त राष्ट्रात नोकरी मिळवून देतो असं सांगितलं, तसेच या महिलेला त्यानं ग्रुप फोटोच्या वेळी व लिफ्टमध्ये नको तसा स्पर्षही केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार या महिलेनं संयुक्त राष्ट्रांच्या बड्या अधिकाऱ्याला चार हात लांब ठेवलं तसेच आपण आपल्या कामाच्या बळावर पुढे जाऊ आणि अशा नोकरीच्या ऑफरची गरज नसल्याचं सुनावलं. त्यानंतर तो सदर अधिकारी त्याच्या देशात निघून गेला. झालं गेलं ते विसरण्याची तयारी ही महिला करत होती. मात्र, ती ज्या प्रकल्पावर काम करत होती त्यामध्ये त्रुटी काढण्यात आल्या. मात्र त्यात काही तथ्य नव्हतं आणि यामागे तोच अधिकारी होता. या महिलेनं नंतर राजीनामा देण्याचीही तयारी केली होती.

संयुक्त राष्ट्रांच्या त्या अधिकाऱ्यानं विशेष म्हणजे नंतर पुन्हा याच महिलेला कामाची ऑफर दिली. मात्र, तिनं आपल्याला ज्या प्रकारे वागणूक मिळाली होती त्याचा निषेध केला व रागही व्यक्त केला. तसेच या घटनेनंतर या महिलेने परराष्ट्र खात्याकडे तक्रार केली व पोलिसांकडेही तक्रार दाखल केली.
परराष्ट्र खात्याने संयुक्त राष्ट्रांकडे याबाबत स्पष्टीकरण मागवले ज्यानंतर एक अंतर्गत समिती नेमण्यात आली. मात्र, या समितीकडून आपल्याला न्याय मिळेल असं वाटत नसल्याचं सांगत भारतीय फौजदारी कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी अशी पीडित महिलेची मागणी आहे. त्या अधिकाऱ्याला राजनैतिक संरक्षण असून ते रद्द करण्यात यावे अशी मागणीही तिनं केली आहे.

दरम्यान संयुक्त राष्ट्रे लैंगिक छळाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असून गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत आणि बिहार पोलिसांना तपासामध्ये संपूर्ण सहकार्य करत असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी कळवल्याचे टाइम्स ऑफ इंडियानं म्हटलं आहे.