दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मोदींच्या राज्यात भ्रष्टाचाराविरोधात बोलण्याचे धाडस करु नका, अन्यथा तुमचाही कपिल शर्मा होईल, असा टोमणा केजरीवालांनी ट्विटवरुन मारला आहे. कपिल शर्माने मुंबई महापालिकेच्या अधिका-यांनी लाच मागितल्याचे ट्विट केले होते. हे ट्विट कपिलने थेट नरेंद्र मोदींना टॅग करत हेच का तुमचे ‘अच्छे दिन’ असा सवाल उपस्थित केला होता. मात्र या ट्वविटनंतर कपिल शर्माच अनधिकृत बांधकाम असल्याचे चौकशीत समोर येत आहे. सध्या कपिलसह बॉलीवूड कलाकार इरफान खानवर अनधिकृत बांधकामाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवर बोट ठेवत कपिल शर्माने मोदींवर टीका केल्यामुळेच त्याच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे.

त्यानंतर कपिलच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी कपिलच्या घरासमोर आंदोलन केले. भ्रष्टाचाराविरोधात आम्ही कपिल शर्मासोबत आहोत, कपिलने आरोप केलेत, आता पैसे मागणा-या अधिका-यांची नावही त्यांने जाहीर करावीत अशी मागणी करत राम कदम यांनी कपिलच्या घराबाहेरच ठीय्या मांडला होता.
तर मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आरोप करुन त्यांची नावे जाहीर करण्यात मौन बाळगल्याप्रकरणी मनसेने सोमवारी कपिल शर्माविरोधात तक्रार दाखल केली होती. मनसे कार्यकर्ते संदीप देशपांडे यांनी मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात कपिल विरोधात तक्रार दाखल करताना भष्टाचाऱ्यांची नावे उघड न केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली होती.
आपल्या टिवटिवमुळे राजकारण सुरु झाल्याचे लक्षात येताच कपिल शर्माने माझा कोणत्याही पक्षावर आरोप नाही. मी फक्त भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडला होता, अशी सारवासारवही केली होती.