दिल्लीचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना प्रकृती ठीक नसल्यामुळे दोन दिवस विश्रांती करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे, आज (मंगळवार) डॉक्टरांनी सांगितले. सोमवारी त्यांना आजारपणामुळे घरीच रहावे लागले होते. मात्र, त्यांनी दिल्ली जल बोर्डाच्या अधिकाऱ्यांना घरीच बोलावून त्यांची बैठक घेत, दिल्लीतील प्रत्येक कुटुंबाला दरमहा २० हजार लिटर पाणी मोफत देण्याची घोषणा केली.
केजरीवाल आजारी; पाण्याबाबत महत्वपूर्ण घोषणा आज?
केजरीवाल यांचे डॉ. विपिन मित्तल म्हणाले की, केजरीवाल यांना आज कार्यालयात जाऊन निदान दोन तास तरी काम करण्याची इच्छा होती. पण, मी त्यांना पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांचे रक्तदाबही उत्तम असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी उपोषण केल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. तसेच, दारू माफियांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले दिल्ली पोलिस शिपाई विनोद कुमार यांच्या कुटुंबियांनाही भेटण्याची केजरीवाल यांची आज इच्छा होती. पण, त्यांची प्रकृती तितकी चांगली नसू, त्यांना दिल्लीबाहेर  न जाण्याचा सल्ला मी दिला आहे. केजरीवाल यांनी या पोलिसाच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.