भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यात केलेल्या विकासाची पुष्टी करण्यासाठी आपण गुजरातमध्ये आलो असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी सांगितले. अरविंद केजरीवाल सध्या गुजरात राज्याच्या चार दिवसांच्या दौ-यावर आहेत. गुजरातमध्ये रामराज्य असल्याचा दावा नेहमीच गुजरात सरकार आणि प्रसारमाध्यमांकडून करण्यात येतो. गुजरातमध्ये शिक्षण, आरोग्य सेवांचा चांगल्याप्रकारे विकास झाला असून, राज्यात कोणताही भ्रष्टाचार होत नसल्याचे अनेकांकडून बोलले जात आहे. त्यामुळेच राज्यातील विकास ‘याचि देहि याचि डोळा’ पाहण्यासाठी आपण गुजरात दौ-यावर आलो असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. आपचे नेते मनिष सिसोदिया आणि संजय सिंग हे सुद्धा अरविंद केजरीवाल यांच्यासह गुजरात दौ-यावर आले असून यावेळी आपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. त्यानंतर केजरीवाल नव्यानेच सुरू झालेल्या बेचारजी येथील मारूती प्लांटला भेट देणार आहेत. अरविंद केजरीवाल हे आपल्या दौ-याच्या पहिल्या तीन दिवसांत सौराष्ट्र आणि कच्छ येथे जाणार असून चौथ्या दिवशी ते बापूनगर येथे जाहीर सभा घेणार आहेत. नरेंद्र मोदींनी गुजरात सोडून अन्य भागातून लोकसभेची निवडणूक लढविल्यास अरविंद केजरीवाल त्यांच्याविरोधात उभे राहणार असल्याचे आम आदमी पक्षातर्फे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.