करोनामुळे जारी करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात काही निर्बंध शिथिल केल्यानंतर दिल्लीतील स्थिती नियंत्रणात असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी येथे सांगितले.

करोनाबाधितांची संख्या वाढून आरोग्य यंत्रणा कोसळली असती अथवा करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात वाढ झाली असती तर ती चिंतेची बाब ठरली असती, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्यास निर्माण होणाऱ्या स्थितीचा मुकाबला करण्यास आपले सरकार तयार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी ऑनलाइन संवाद साधताना स्पष्ट केले.

टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात अनेक निर्बंध शिथिल केल्याने करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वाटत होती. चौथा टप्पा सुरू होऊन एक आठवडा झाल्यानंतर आता स्थिती नियंत्रणात असल्याचे आणि नागरिकांनी भयभीत होण्याची गरज नसल्याचे आपण म्हणू शकतो, असेही केजरीवाल म्हणाले.