अरविंद केजरीवाल यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आपली केंद्राशी समन्वय साधून काम करण्याची इच्छा असल्याचे सांगून, राजधानीतील सुकर प्रशासनासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वादही मागितले.

निवडणुका संपलेल्या असल्यामुळे आता राजकारणही संपले आहे आणि निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्यांबद्दल आपण आपल्या विरोधकांना ‘माफ केले आहे’, असेही रामलीला मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभानंतर केलेल्या भाषणात केजरीवाल म्हणाले.

आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा असलेले केजरीवाल यांनी भाषणाची सुरुवात ‘भारतमाता की जय’ आणि ‘इन्किलाब झिंदाबाद’ या घोषणांनी, तर समारोप ‘हम होंगे कामयाब’ हे गाणे गाऊन केली.  स्वत:चे वर्णन ‘दिल्लीचा पुत्र’ असे करून, हा विजय माझा नव्हे, तर प्रत्येक दिल्लीकराचा आहे असे केजरीवाल म्हणाले. दिल्लीच्या सुकर प्रशासनासाठी आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद हवे आहेत, असेही ते भाषणात म्हणाले.

गेल्या पाच वर्षांत मी कुणालाही सावत्रपणाची वागणूक दिली नाही आणि सर्वासाठीच काम केले, असे केजरीवाल म्हणाले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काहीजणांनी ‘आप’ला, काहींनी भाजपला, तर काहींनी काँग्रेसला मतदान केले; मात्र आजपासून मी सर्वाचाच मुख्यमंत्री आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

सहा मंत्र्यांचा शपथविधी

मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, कैलास गहलोत, गोपाल राय, राजेंद्रपाल गौतम आणि इम्रान हुसेन या सहा आमदारांनी याच कार्यक्रमात मंत्रिपदाची शपथ घेतली. नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.